सातारा - जिल्हा पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी कडकनाथ आर्थिक घोटाळा प्रकरणी शेतकऱ्यांची तक्रार दाखल करून घेण्यास पाटण पोलीस ठाण्यात सांगितले होते. त्यानंतर शुक्रवारी गुन्हे नोंद करण्यात आले. यामध्ये सागर सदाभाऊ खोत यांना आरोपी करण्यात आले. मात्र, यावर आज पोलिसांनी प्रिंटिंग मिस्टेक सांगून खोत यांना साक्षिदार कले असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे पोलीस मंत्र्यांच्या मुलाला वाचवण्याचा प्रयत्न तर करत नाही ना? अशी चर्चा रंगत आहे.
हेही वाचा - 'कडकनाथ' घोटाळा प्रकरण : सांगलीत स्वाभिमानी व प्रहार संघटनेचा आसूड मोर्चा
कडकनाथ कोंबडी पालन व्यवसायात आर्थिक फायद्याचे आमिष दाखवून पाटण तालुक्यासह जिल्ह्यातील ७२ शेतकऱ्यांची सुमारे दीड कोटी रुपयांची फसवणूक झाली आहे. या प्रकरणी इस्लापूर येथील रयत अॅग्रो इंडिया व महारयत अॅग्रो इंडिया कंपनीचे संस्थापक सुधीर मोहिते, संदीप मोहिते, गणेश गेवाळे याच्या विरोधात पाटण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. सचिन शिर्के (रा. नेरळे, ता. पाटण) यांनी तक्रार दिली आहे. त्यांनी दिलेल्या तक्रारीत सागर सदाभाऊ खोत यांचे नाव नमूद होते. मात्र, आज या प्रकरणाला वेगळे वळण लागले आहे.
हेही वाचा - ''कडकनाथ' प्रकरणी सदाभाऊ खोतांचा राजीनामा घ्यावा'
पोलिसांचा मंत्र्याच्या मुलाला वाचवण्याचा प्रयत्न -
याबाबत माहिती देताना पोलीस ठाण्याच्या निरीक्षक तृप्ती सोनवणे म्हणाल्या, सागर खोत यांचा कडकनाथच्या दीड कोटींच्या फसवणूक प्रकरणाशी काहीही संबंध नाही. फिर्यादीमध्ये आरोपींच्या यादीत त्यांचे नाव चुकून गेले आहे. फिर्यादी पैसे देताना ते कार्यालयात उपस्थित असल्यामुळे ते या प्रकरणात साक्षीदार आहेत. आमच्याकडून प्रिटींगची चूक झाल्याने त्यांचे नाव संशयीतांच्या यादीत गेले आहे.