सातारा - कोरेगाव तालुक्यातील एकावर गुटखा विक्री प्रकरणी दाखल असलेल्या गुन्ह्यात मदत करून, त्याला जामीन मिळून देण्यासाठी संशयिताच्या भावाकडून 20 हजारांची लाच घेताना, कोरेगाव पोलीस ठाण्यातील सहायक फौजदार प्रल्हाद श्रीरंग पाटोळे याला साताऱ्याच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले आहे.
जामीनासाठी मागितले 20 हजार
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कोरेगाव तालुक्यातील एकावर महाराष्ट्रात बंदी असलेल्या गुटख्याची विक्री केल्याप्रकरणी कोरेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. संशयिताला संबंधित गुन्ह्यात मदत करून, जामीन मिळवून देण्यासाठी त्याच्या नातेवाईकांकडे पाटोळेने 20 हजार रुपयांची मागणी केली होती. मात्र लाच देण्याची इच्छा नसल्याने, संबंधित व्यक्तीने याची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे केली होती. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून मिळालेल्या तक्रारीची पडताळणी केली असता, पाटोळे हा लाच मागत असल्याचे समोर आले.
लाचखोर पोलिसावर गुन्हा दाखल
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने शनिवारी कोरेगाव पोलीस ठाणे परिसरात सापळा लावला होता. त्यात पाटोळे हा 20 हजारांची लाच घेताना रंगेहात पकडला गेला. त्याच्यावर लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यानुसार कोरेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागातील पोलीस निरीक्षक आरिफा मुल्ला, अविनाश जगताप व त्यांच्या सहकाऱ्यांनी केली.