सातारा - वंचित बहुजन आघाडीच्यावतीने शुक्रवारी (दि. 24) महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली आहे. या बंदच्या पार्श्वभूमीवर कराड शहरात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
हेही वाचा - महसूल विभागाकडून शेतकऱ्यांची पिळवणूक, स्वाभिमानीकडून आंदोलनाचा इशारा
वंचित बहुजन आघाडीचे नेते डॉ. प्रकाश आंबेडकर यांनी 24 जानेवारीला महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. त्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीच्या समर्थकांनी कराडमध्ये व्यावसायिकांना पत्रके वाटून बंदमध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. चार दिवसांपूर्वीच नागरीकत्व सुधारणा आणि नागरीकत्व नोंदणी कायद्याच्या विरोधात वंचित बहुजन आघाडीच्यावतीने सर्वपक्षीय आणि सर्वधर्मीय कराड तहसील कार्यालयावर विराट मोर्चा काढण्यात आला होता. त्यातच महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली असल्यामुळे कराड पोलिसांनी शहरात मोठा बंदोबस्त तैनात केला आहे. कराड शहर आणि ग्रामीण पोलीस ठाण्याचे मिळून शंभरहून अधिक कर्मचारी आणि दहा अधिकारी बंदोबस्तासाठी नेमण्यात आले आहेत.