सातारा : महागडा मोबाईल देण्याचे अमिश दाखवून 65 हजाराला गंडा घालणा-या पुण्यातील भामट्याच्या वाई पोलिसांनी मुसक्या आवळल्या. किरण गणपती गायकवाड (वय 35 रा. उत्तरेश्वरनगर, लोहगाव पुणे. मुळ रा. सोलापूर) असे आरोपीचे नाव आहे. तर इम्रान शफी सय्यद यांनी पोलिसात तक्रार दाखल केली होती.
पैसे मिळताच फोन केला बंद-
24 नोहेंबरला आरोपीने आयफोन 12 प्रो 128 जीबीचा मोबाईल खरेदीचा व्यवहार फिर्यादी इम्रान शफी सय्यद यांच्याशी ठरवला होता. गुगल पे व्दारे 65 हजार रुपये पाठवण्यास सय्यदला सांगण्यात आले. त्यामुळे सय्यद यांनी त्याच्या भावाच्या अकाऊंटवरून गुगल पे ला लिंक असलेला मोबाईल नंबर गायकवाडला पाठविला. सय्यद याने 65 हजार पाठवल्यानंतर आरोपीने लगेच फोन स्विच ऑफ केला.
मोबाईल बंद असताना झाला तपास-
आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर सय्यद यांनी वाई पोलीस ठाण्यात तक्रार दिली. हा गुन्हा मोबाईलव्दारे तांत्रिक पध्दतीने केला होता. मात्र, गुन्ह्यात वापरलेला मोबाईल बंद असल्याने तपास करणे अवघड झाले होते. त्यामुळे आरोपीच्या फसवणूकीची पद्धतीची माहिती आणि आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलिसांचे एक पथक पुण्याला गेले.
अखेर पोलिसांनी आरोपीच्या मुस्क्या आवळल्या-
अखेर 12 डिसेंबरच्या रात्री संशयीत किरण गायकवाडला अटक करण्यात आली. गणेश अशोक भालेराव (रा. पुणे) याच्या साथीने त्याने हा गुन्हा केले असल्याची कबुली दिली आहे. त्याच्याकडून गुन्ह्यात वापरलेला मोबाईल व फसवून घेतलेले 65 हजार रुपये हस्तगत करण्यात आले आहेत. ही कारवाई पोलीस निरीक्षक आनंदराव खोबरे आणि त्यांच्या सहका-यांनी केली.