सातारा - उमरगा तालुक्यातून शंभू महादेवाच्या दर्शनासाठी येणाऱ्या महिला भाविकांच्या गाडीवर शिंगणापूर घाटात दरोडा टाकून सुमारे 1 लाख रुपयांचे दागिने लुटल्याची घटना घडली होती. ही चोरी करणाऱ्या टोळीचा नातेपुते पोलिसांनी छडा लावला आहे. याप्रकरणी फलटण तालुक्यातील गोखळी येथील वीटभट्टीवर काम करणाऱ्या 3 जणांना पोलिसांनी जेरबंद केले आहे.
मराठवाड्यातील उमरगा तालुक्यातील चिवरी येथील काही महिला भाविक 11 मार्चला क्रुझरमधून (एम.एच 13 ए.सी 8359) शिंगणापूर याठिकाणी शंभू महादेवाच्या दर्शनासाठी निघाल्या होत्या. शिंगणापूर-फलटण मार्गावरील कोथळे घाटातून रात्री साडेदहाच्या सुमारास शिंगणापूरकडे जात असताना तीन मोटारसायकलवरून आलेल्या 6 जणांनी गाडी अडवून मारहाण केली. तसेच महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्रे व कानातील दागिने, रोख रक्कम व मोबाईल असा एकूण 1 लाख 5 हजार 600 रूपयांचा ऐवज लंपास केला होता.
या घटनेनंतर शिंगणापूर तसेच नातेपुते पोलीस या अज्ञात दरोडेखोरांच्या शोधात होते. संशयित आरोपी फलटण तालुक्यातील गोखळी येथील वीटभट्टीवर कामाला असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर नातेपुते पोलिसांनी राहुल अप्पासाहेब माळी (वय-19 रा मुसळवाडी ता राहुरी), राहुल उर्फ टग्या एकनाथ बर्डे (वय-22 रा. पढेगाव ता.श्रीरामपूर) संदीप सुरेश पिंपळे (वय-22 रा माणुरी ता.राहुरी) या तिघांना जेरबंद केले आहे. तिघेही मूळ अहमदनगर जिल्ह्यातील असून गोखळी येथील वीटभट्टीवर मजुरी करत असल्याची माहिती मिळाली आहे. संशयित आरोपींनी अन्य साथीदारांच्या मदतीने शिंगणापूर घाटात लूटमार केल्याची कबुली दिली असून न्यायालयाने संशयित आरोपींना 6 जुलैपर्यंत पोलीस कोठडी दिली आहे.