सातारा - जिल्ह्यातील दहिवडी (ता. माण) येथे अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाला आहे. या प्रकरणी पोलिसांनी अल्पवयीन चुलत भावासह एकावर गुन्हा दाखल केला आहे.
हेही वाचा - कराडमधील धोकादायक बागवान इमारत जमीनदोस्त
चुलतभावानेही घेतला गैरफायदा
दहिवडी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, माण तालुक्यातील एका गावात ऑक्टोबर 2020 पासून एका अल्पवयीन मुलीस धमकी देऊन गावातीलच एकोणीस वर्षीय मुलाने शारिरीक संबंध ठेवले. दोघांचे हे संबंध मुलीच्या 15 वर्षीय चुलत भावास समजल्यावर त्याने 'मी बाहेर सांगेन' असे म्हणत मुलीसोबत जबरदस्तीने शारिरीक संबंध ठेवले. दरम्यान मुलगी गर्भवती झाल्याने घरच्यांच्या ही गोष्ट लक्षात आली.
पोलीस कोठडीत रवानगी
मुलीच्या आईने काल रात्री दहिवडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. या गुन्ह्यातील संशयितास अटक करण्यात आली असून विधीसंघर्ष बालकास ताब्यात घेण्यात आले आहे. एकोणीस वर्षीय संशयितास वडूजच्या सत्र न्यायालयासमोर हजर केले असता त्यास पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. विधिसंघर्ष बालकास साताऱ्यातील बालसुधारगृहात ठेवण्यात आले आहे. घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. निलेश देशमुख यांनी भेट दिली. सहाय्यक पोलीस निरीक्षक राजकुमार भुजबळ पुढील तपास करत आहे.
आठ दिवसात तिसरी घटना
जिल्ह्यात जावळी, वनवासवाडी आणि दहिवडी येथे अल्पवयीन मुलींवर बलात्काराची उघडकीस आलेली आठ दिवसातील ही तिसरी घटना आहे. तिन्ही प्रकरणांत सातवीतील मुली सात महिन्यांच्या गर्भवती होण्याचे प्रकार घडले. तिन्ही घटनेत अल्पवयीन मुलींवर अल्पवयीनांकडून (विधिसंघर्ष बालकांकडून) ओळखीतून अत्याचार झाला आहे. त्यांना त्रास होऊ लागल्यानंतर ही तिन्ही प्रकरणे उघडकीस आली. या प्रकारांबाबत पालकांतून चिंता व्यक्त होत आहे.
हेही वाचा - आठ महिन्यांच्या मुलासह विवाहितेची मावशीच्या गावात आत्महत्या