सातारा - जिल्ह्यातील ग्रामीण व शहरी क्षेत्रामधील वेळोवेळी निश्चित केलेली बाधित क्षेत्र वगळून चालू असलेल्या बांधकामास प्रांताधिकारी यांच्या परवानगीने काम सुरू ठेवण्यास जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी परवानगी दिली. हे बांधकाम करताना बांधकामदाराला काही अटी बंधनकारक करण्यात आल्या आहेत.
साथरोग प्रतिबंधात्मक कायदा 1897 मधील अधिसूचना व नियमावलीमधील तरतुदीनुसार जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी ही परवानगी दिली आहे.
खेड्यात व शहरात बांधकामे चालू ठेवण्यासाठी 'या' अटी व शर्तींवर मिळणार परवानगी चालू असलेल्या बांधकामास काम चालू करण्यासाठी अर्जदाराने संबंधित प्रांताधिकाऱ्यांकडे रितसर परवानगी घेणे बंधनकारक राहील. नगरपालिका, शहरी क्षेत्रामध्ये पूर्वीपासून चालू असलेली बांधकामे पूर्ववत चालू ठेवण्यासाठी परवानगी राहील. प्रांताधिकारी फक्त कोरोना कालावधीसाठी चालू असलेल्या बांधकाम करण्यासाठीच परवानगी देतील.नगरपालिका शहरी क्षेत्रामध्ये सद्यस्थितीत बांधकामे चालू आहे, अशा ठिकाणावरील कामगार हे कामाचे आवाराच्या बाहेर जाणार नाहीत याची दक्षता घ्यावी. तसेच संबंधित ठेकेदार यांनी कामगार यांच्या खाण्या-पिण्याची सोय कामाच्या आवारातच करणे आवश्यक आहे, अशी बंधने जिल्हाधिकाऱ्यांनी बांधकामदारावर घातली आहेत.अटी व शर्ती अशा- या बांधकाम कामावरील कामगार त्याठिकाणी वास्तव्यास असणे बंधनकारक- क्षेत्राबाहेरील कोणताही कामगार आणू नये- ग्रामीण भागात चालू बांधकाम चालू करण्यासाठी अर्ज करावा- बांधकामाच्या परवानगीबाबत 100 रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर शपथपत्र घ्यावे - चालू असलेल्या बांधकामास विनाविलंब परवानगी मिळेल- बांधकाम ठिकाणी 5 किंवा त्यापेक्षा जादा कामगारांची गर्दी नको- याची जबाबदारी ठेकेदारावर - 5 पेक्षा जादा कामगारांची गर्दी होईल, असे कोणत्याही प्रकारचे बांधकाम करु नये- परवानगी जिल्ह्यात रहिवास असलेल्या कामगारांसाठीच - नव्याने परजिल्ह्यातील कामगार कामावर येणार नाहीत - कामाच्या ठिकाणी मास्क, सॅनिटायझर आणि सोशल डिस्टन्सिंग पाळणे बंधनकारक आहे.