सातारा - जिल्ह्यातील अनेक नेत्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला रामराम करत भाजपमध्ये प्रवेश केला. मात्र त्यांच्या मागे नक्की किती कार्यकर्ते आहेत, हे पाहण्यासाठी जिल्ह्यातील अनेक नेत्यांची कसरत लागणार आहे. त्यावरच जिल्ह्यात होत असलेल्या विविध पंचायत समितींच्या निवडणुकीतील राजकारणाचा कस लागणार आहे.
हेही वाचा... पंचायत समिती सभापती निवड: तिवसा, धामणगाव रेल्वेत काँग्रेस तर चांदूर रेल्वेत भाजप
माण पंचायत समिती सभापती कोण होणार...
पंचायत समिती सभापतीचे आरक्षण जाहीर झाले. माण सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी आरक्षित झाला आहे. या प्रवर्गातून आंधळी गणाच्या पंचायत समिती सदस्या कविता जगदाळे ह्या प्रबळ दावेदार आहेत. तर नवीन राजकीय समीकरणे उदयास येऊन अन्य कोणी बाजी मारणार का? याकडे लक्ष लागले आहे.
माण पंचायत समितीच्या दहा जागांपैकी पाच जागा राष्ट्रवादी काँग्रेस, तीन जागा काँग्रेस तर प्रत्येकी एक जागा भाजप व रासपने जिंकली आहे. चालु पंचवार्षिकची पहिली अडीच वर्षे राष्ट्रवादी-रासप यांनी एकत्रित येऊन सत्ता मिळवली. सभापतीपदी रमेश पाटोळे यांची तर उपसभापती पदी नितीन राजगे यांची वर्णी लागली होती. मात्र त्यानंतर आत्ताच्या विधानसभा निवडणूकीपर्यंत बरीच राजकीय उलथापालथ झाली. राष्ट्रवादीच्या शेखर गोरे यांनी शिवसेनेचा धनुष्यबाण जवळ केला. काँग्रेसच्या आमदार जयकुमार गोरे यांनी भाजपचे कमळ हातात घेतले. विधानसभा निवडणूकीत आमदार गोरे भाजपकडून, शेखर गोरे शिवसेनेकडून लढले. तर आमचे ठरलंय म्हणत सर्वपक्षीय नेते मंडळी अपक्ष लढणार्या राष्ट्रवादीच्या प्रभाकर देशमुख यांच्यासोबत राहिली.
हेही वाचा... वसईत अमेरिकेतून परतलेल्या सुनेची सासूकडून हत्या, डोक्यात घातला फ्लॉवरपॉट
विधानसभा निवडणुकीत मार्डी गणाचे रमेश पाटोळे, मलवडी गणाचे विजयकुमार मगर, पळशी गणाचे नितीन राजगे, आंधळी गणाच्या कविता जगदाळे हे शेखर गोरे यांच्या सोबत राहिले. तर गोंदवले बुद्रुक गणाचे तानाजी कट्टे, वर-म्हसवड गणाच्या लतिका विरकर व कुकुडवाड गणाचे तानाजी काटकर यांनी प्रभाकर देशमुख यांना साथ दिली. बिदाल गणाच्या अपर्णा भोसले, वावरहिरे गणाच्या रंजना जगदाळे व वर-मलवडी गणाच्या चंद्रिका आटपाडकर यांनी आमदार जयकुमार गोरे यांचे नेतृत्व स्वीकारले.
कागदोपत्री राष्ट्रवादी पाच, काँग्रेस तीन, रासप व भाजप प्रत्येकी एक असे बलाबल दिसत असले तरी प्रत्यक्षात हे समीकरण आकारास येईल का याबद्दल उत्सुकता आहे. राष्ट्रवादी-रासप यांची आघाडी अभेद्य राहिली तर सर्वसाधारण महिला प्रवर्गातील एकमेव उमेदवार म्हणून कविता जगदाळे यांच्या गळ्यात सभापतीपदाची माळ पडू शकते. शेखर गोरे हे सुध्दा कविता जगदाळे यांच्या उमेदवारीस हिरवा कंदील दाखवतील. नागरिकांच्या मागास प्रवर्गातील (महिला) लतिका विरकर यासुध्दा मागणी करण्याची शक्यता आहे. मात्र सर्वसाधारण महिला आरक्षणाचा मुद्दा पुढे करुन त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला जाईल. आमदार जयकुमार गोरे मात्र राष्ट्रवादी, रासपमध्ये काही बेबनाव झाला तर फायदा घेण्याच्या तयारीत असतील. त्यावेळी ते अपर्णा भोसले यांना सभापतीपदाच्या निवडणुकीत उतरवण्याची शक्यता आहे.
हेही वाचा... चारा छावण्यातील गैरप्रकारावर सरकारला कारवाई करण्यास भाग पाडू - राजू शेट्टी
खटाव पंचायत समितीवर कोण गाजवणार सत्ता...
मिनी मंत्रालय म्हणून गणली गेलेल्या खटाव पंचायत समितीवर राष्ट्रवादीचे निर्विवाद वर्चस्व आहे. गत विधानसभेवेळी राजकीय दृष्ट्या ग्रहण लागलेल्या राष्ट्रवादी पक्षाला लागलेली घरघर खटाव पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडूणक निकालानंतर थोड्याफार प्रमाणात थांबली. म्हासुर्णे गणातील हुताम्यांचे गाव म्हणून राज्याला परिचित असणारे जयराम स्वामींचे वडगावच्या रेखा संतोष घार्गे यांना की, पुसेसावळीच्या जयश्री संभाजी कदम यांना संधी मिळणार याकडे तालुक्याचे लक्ष लागून राहिले आहे.
नुकतेच पंचायत समिती सभापती आरक्षण जाहीर झाली यामध्ये खटाव पंचायत समिती सभापती पदासाठी सर्वसाधारण महिला हे आरक्षण आरक्षित करण्यात आले. खटाव पंचायत समितीवर राष्ट्रवादी पक्षाचे आठ सदस्य, काँग्रेसचे दोन तर भाजपचे दोन सदस्य आहे. खटाव पंचायत समिती सदस्य यांच्यामुळे राष्ट्रवादी पक्षाला उर्जितावस्था प्राप्त झाली. मात्र माजी सभापती संदीप मांडवे यांच्यावरील नाट्यमयरीत्या दाखल झालेल्या अविश्वास ठरावाच्या वृत्ताने पक्षासह तालुक्यातील पदाधिकारी यांच्यात मोठा संघर्ष झाला. त्यानंतर सभापती पदी कल्पना नंदकुमार मोरे यांची वर्णी लागली. पक्षाला उभारी देणारे नेतृत्व लाभले. दोन्ही स्थानिक स्वराज्य संस्थेत स्वतःच्या गटासह इतर गट व गणात आपली व पक्षाची पाळेमुळे घट्ट करण्यात मोठे यश मिळाले. खटाव तालुक्यात गट-तट विसरून केलेली विकासकामे यामुळे राष्ट्रवादी पक्षाचा झेंडा उंचवला आहे.
हेही वाचा... कार्यकर्त्यांनो आंदोलन करताना जरा सावधान; राहुल गांधींचा पुतळा जाळणे बेतले असते जीवावर
खटाव पंचायत समितीत राष्ट्रवादी पक्षाला गतवैभव प्राप्त करून देण्यात सिंहाचा वाटा उचलेले अनेक कार्यकर्ते आहेत. लवकरच खटाव तालुक्यातील प्रमुख गावांसह ७५ टक्के गावातील ग्रामपंचायत निवडणूकीचा बिगुल वाजणार आहे. त्यामुळे सभापती पदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार की कल्पना मोरे याच टिकून राहणार याकडे लक्ष लागलेले आहे.
पाटण पंचायत समितीचा सभापती कोण होणार...
पाटण पंचायत समितीच्या पुढील अडीच वर्षांच्या कालावधीसाठी सभापती पदाची सोडत जाहीर झाली. यात नागरीकांचा मागास प्रर्वग (खुला) असे आरक्षण पडले आहे. सध्या पाटण पंचायत समितीत पाटणकर गटाची सत्ता असल्याने सभागृह चालवण्यात नेहमीच किंगमेकर ठरलेले राजाभाऊ शेलार आणि उज्वला जाधव यांची नावे चर्चेत आहेत. त्यातही पंचायत समितीचा दांडगा अनुभव असलेले ज्येष्ठ नेते राजाभाऊ शेलार यांच्या गळ्यात पुन्हा एकदा पंचायत समितीच्या सभापतीपदाची माळ पडण्याची शक्यता नाकारता येत नाही.
पाटण पंचायत समितीवर सध्या पाटणकर गटाची सत्ता असून माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर व सत्यजितसिंह पाटणकर यांच्या नेतृत्वाखाली पाटणकर गटाचे 8 सदस्य आहेत. सभापतीपदी उज्वला जाधव व उपसभापती म्हणून राजाभाऊ शेलार हे कार्यभार सांभाळत आहेत. तर विरोधी देसाई गटाचे 6 सदस्य कार्यरत असून विरोधी गटनेते म्हणून पंजाबराव देसाई हे आहेत. मागील अडीच वर्षे उपसभापती राजाभाऊ शेलार हे जरी होते तरी सभागृहाची सर्व सुत्रे त्यांच्याच हाती होती. आजपर्यंत राजाभाऊ शेलार यांनी नेटाने सभागृह चालविले असून आरोप-प्रत्यारोपांवर यशस्वीपणे मात करण्यात राजाभाऊ यांचा चांगलाच हातखंडा आहे. सर्व अधिकारी, कर्मचारी वर्गाला विश्वासात घेऊन उत्कृष्ठपणे काम करण्याची कसब राजाभाऊंकडे आहे.
हेही वाचा... 'अनुभव नसला तरी आत्मविश्वास भरपूर, जनतेचे प्रश्न मार्गी लावू'
पुढील अडीच वर्षाच्या कालावधीसाठी होणाऱ्या सभापतीपदाच्या आरक्षणाकडे सर्वांच्या नजरा लागल्या होत्या. मात्र पाटण पंचायतीच्या सभापती पदासाठी नागरिकांचा मागास प्रर्वासाठी (खुला गट) सोडत निघाल्याने अनेकांच्या अपेक्षांवर पाणी फिरले. सत्ताधारी पाटणकर गटाकडून नागरिकांचा मागास प्रर्वगातून म्हावशी गणातून उज्वला लोहार आणि शिरळ गणातून निवडून आलेले राष्ट्रवादीचे सदस्य असलेले राजाभाऊ शेलार हे दोन सदस्य सभापतीपदासाठी दावेदार आहेत. मागील अडीच वर्षासाठी सभापती पद हे महिला वर्गाकडे होते. त्यामुळे आता पुढील अडीच वर्षासाठी सभापतीपद हे पुरूष गटाकडे जाण्याची शक्यता आहे. नागरिकांचा मागास प्रर्वग (खुला गट) आरक्षण असल्याने राजाभाऊ शेलार हेच पुन्हा एकदा पाटण पंचायत समितीचे सभापती होऊ शकतात. यापूर्वी जिल्हा परिषद सदस्य व जिल्हा शेती सभापती, पाटण पंचायत समितीचे एक वेळ सभापती, दोन वेळा उपसभापती तर आता सभापतीपदी त्यांची पुन्हा एकदा वर्णी लागण्याची शक्यता असल्याने राजाभाऊ शेलार यांना पुन्हा एकदा राजयोग आला आहे, असेच यानिमित्ताने म्हणावे लागले.
हेही वाचा... '...तर शिवसेनेने काँग्रेसच्या पाठिंब्यावरील सरकार बरखास्त करावे'
कोण होणार फलटण पंचायत समिती सभापती...
फलटण समितीचे सभापती पद पुढील अडीच वर्षांसाठी सर्व साधारण (खुला) गटासाठी असल्याने आजची परिस्थिती पहाता आसू गणातून निवडुन आलेले व सध्या उपसभापती म्हणून कार्यरत असलेले शिवरूपराजे खर्डेकर आणि वाठार निंबाळकर गणातून निवडुन आलेले विश्वजितराजे नाईक निंबाळकर असे दोन दावेदार आहेत. तथापि शिवरूपराजे यांचा स्थानिक स्वराज्य संस्थेत काम करण्याचा अनुभव लक्षात घेता ते प्रबळ दावेदार ठरु शकतात.
मागील अडीच वर्षाच्या कालावधीत सभापती पद सर्व साधारण महिलेसाठी असल्याने होळ गणातून निवडुन आलेल्या रेश्मा भोसले व हिंगणगाव गणातून विजय मिळविलेल्या प्रतिभा धुमाळ यांना सभापती होण्याची संधी मिळाली होती. फलटण पंचायत समितीत सत्तारूढ राष्ट्रवादी काँग्रेसचे १२ तर विरोधी राष्ट्रीय काँग्रेसचे २ असे सदस्यीय बलाबल आहे. तेव्हा उद्याच्या सभापती निवडीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या (राजेगट) उमेदवारालाच संधी मिळणार यात शंका नाही.
सभापती पदासाठी शिवरूपराजे खर्डेकर आणि विश्वजितराजे नाईक निंबाळकर हे दोन प्रबळ दावेदार असले तरी विधान परिषद सभापती रामराजे नाईक निंबाळकर व जिल्हा परिषद अध्यक्ष संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या विचारातूनच सभापती ठरणार यात शंका नाही. शिवरूपराजे खर्डेकर यांनी बाजार समितीचे संचालक म्हणून काम केले आहे, तसेच सध्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक व पंचायत समितीचे उपसभापती म्हणून कार्यरत आहेत. तेव्हा त्यांच्या अनुभवाचा कालावधी व कार्यप्रणाली लक्षात घेता त्यांचे नाव सभापती पदासाठी अग्रेसर असेल अशी चर्चा तालुक्यात होताना दिसत आहे.
हेही वाचा... 'नागरिकत्व दुरुस्ती कायदा हजार टक्के बरोबर निर्णय' मोदींनी काँग्रेसवर साधला निशाणा