सातारा - संयुक्त महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री दिवंगत यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतीदिनानिमित्त 'कराड शेती उत्पन्न बाजार समिती'च्या वतीने कृषी-औद्योगिक आणि पशु-पक्षी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. गेल्या 15 वर्षांपासून या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात येते. 24 ते 28 नोव्हेंबर दरम्यान हे कृषी प्रदर्शन भरणार आहे.
माजी सहकार मंत्री विलासकाका पाटील-उंडाळकर यांच्या संकल्पनेतून आणि बाजार समितीच्या माध्यमातून 15 वर्षांपूर्वी प्रदर्शनास प्रारंभ झाला होता. दरवर्षी सुमारे 10 लाख लोक या प्रदर्शनाला भेट देतात. परदेशातील कंपन्यांही प्रदर्शनात सहभागी होतात.
हेही वाचा - दुचाकीच्या धडकेत सहा वर्षाच्या बालकाचा जागीच मृत्यू
कराड शेती उत्पन्न बाजार समिती आणि महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाचा या प्रदर्शनाच्या आयोजनात प्रामुख्याने सहभाग असतो. विलासकाका उंडाळकर हे यशवंतराव चव्हाण यांचे शिष्य आणि त्यांच्या विचारांचे पाईक म्हणून महाराष्ट्रभर परिचित आहेत. विलासकाका उंडाळकर यांची ही मूळ संकल्पना असून कराड बाजार समितीने ती गेली 16 वर्षे अखंडीतपणे राबविली. 25 नोव्हेंबर रोजी यशवंतराव चव्हाण यांचा स्मृतीदिन आहे.
यशवंतरावांच्या स्मृतीदिनी मुख्यमंत्र्यांसह अनेक मंत्री कराडातील यशवंतरावांच्या समाधीस्थळी अभिवादन करण्यासाठी येतात. त्यांच्याच हस्ते या प्रदर्शनाचे उद्घाटन होते. मात्र, यंदाच्या राजकीय पेचप्रसंगामुळे कोणत्याही राजकीय मान्यवरांना प्रदर्शनासाठी आमंत्रित केलेले नाही. त्यामुळे प्रदर्शनाचे औपचारिक उद्घाटन प्रगतशील शेतकर्यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. 25 नोव्हेंबरला पणन खात्याचे माजी संचालक डॉ. राम खर्च यांच्या हस्ते प्रदर्शनाचे अधिकृतरित्या उद्घाटन होईल.
हेही वाचा - साताऱ्यात बळीराजावर अवेळी पावसाचे संकट ; कांदा पिकावर फिरवला रोटाव्हेटर
26 नोव्हेंबरला बाल गंधर्व संगित रसिक मंडळाचा आणि सुरेश साखवळकर दिग्दर्शित संत कान्होपात्रा नाटकाचा मोफत प्रयोग होणार आहे. तर 28 नोव्हेंबरला राहुरीच्या महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. राजाराम देशमुख यांच्या हस्ते प्रगतशील शेतकर्यांना 'शेतीनिष्ठ' पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. प्रदर्शनाच्या 4 दिवसांच्या कालावधीत कृषी औद्योगिक, पशु-पक्षांचे प्रदर्शन आणि स्पर्धाही होणार आहेत. प्रदर्शनात 300 हून अधिक स्टॉल असणार आहेत.