सातारा - जिल्हा प्रशासनाने माण तालुक्यात चारा छावण्यांना मंजुरी दिली आहे. त्यामधील १८ चारा छावण्या चालू झाल्या आहेत. मात्र या ठिकाणी जनावरांची तपासणी करण्यासाठी पशुवैद्यकीय अधिकारी व कर्मचारी येत नसल्याचे शेतकऱ्यांनी माध्यमांना सांगितले. यानंतर जिल्हा परिषद पशुसंवर्धन विभाग खडबडून जागा झाला असून पशुवैद्यकीय अधिकाऱयांना तत्काळ तपासणीसाठी जाण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
जिल्हा पशुसंवर्धन विभागाने याची तात्काळ दखल घेत, जिल्ह्यातील इतर तालुक्यांतील कर्मचाऱ्यांना माण तालुक्यातील चारा छावण्यांवर जाऊन तपासणी करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच तेथे औषध पुरविण्यासही सांगण्यात आले असल्याची माहिती जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. विनोद पवार यांनी दिली आहे. त्यामुळे लवकरच चारा छावण्यांवर जनावरांची तपासणी औषधोपचारासाठी अधिकारी-कर्मचारी दाखल होणार आहेत.
मागील तीन ते चार महिन्यांपूर्वी दुष्काळी भागात शेकडो शेळ्या, मेंढ्या व जनावरांचा लाळीच्या रोगाने मृत्यू झाल्या होत्या. ही घटना ताजी असतानाच चारा छावण्या तपासणीकडे प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. याकडे तत्काळ लक्ष देऊन अशा घटनांना आळा घालण्याची मागणी शेतकऱयांनी केली आहे.