सातारा - शेतातील चाळीत विक्रीसाठी साठवून ठेवलेला तब्बल २० क्विंटल कांदा चोरट्यांनी लंपास केल्याची घटना पळशी (ता. खंडाळा) येथे घडली. याप्रकरणी पोलिसात अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.
बाजारात कांद्याचे दरात चढ उतार होत असल्याने व निश्चित भाव मिळत नसल्याने अनेक शेतकरी शेतातच चाळी करून कांदा साठवून ठेवत आहेत. विठ्ठल किसन भरगुडे (वडगाव रोड, पळशी, ता. खंडाळा) यांनी दहाबिगा शिवारातील चाळीत कांदा साठवून ठेवला होता. येत्या काळात ते कांदा विकणार होते. रात्री बारा ते पहाटे सहाच्या दरम्यान चोरट्यांनी कांदा लंपास केला. ही बाब सकाळी समोर आल्यावर भरगुडे यांनी पोलिसांत धाव घेतली. या प्रकरणी शिरवळ पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहाय्यक फौजदार पांडुरंग हजारे अधिक तपास करत आहेत.
सध्या स्थानिक बाजारात कांद्याचा किरकोळ विक्रीचा भाव ३५ ते ४० रुपये किलो आहे. भाव वाढत असल्याने आता चोरट्यांनी आपला मोर्चा कांदा चाळीकडे वळविला आहे. कांदा चोरीला गेल्याने परिसरातील शेतकरी वर्गात एकच खळबळ उडाली. आता सध्या बाजारात भाजीपाल्याला व कांदा बटाटा पिकाला भाव असल्याने शेतमालाच्या चोऱ्या वाढल्या आहेत. अतिवृष्टीने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत असताना आता शेतमालाच्या चोरीने शेतकरी त्रस्त आहेत.