सातारा - कोरेगाव तालुक्यातील रहिमतपूर पोलीस ठाण्यातील 48 वर्षीय हवालदारल यांचा सातारा येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू असताना कोरोनाने मृत्यू झाला. सातारा पोलीस दलातील कोरोनाने दुसरा बळी गेला असल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.
मृत हवालदार यांनी 1991 मध्ये सातारा जिल्हा पोलीस दलात रुजू झाले होते. प्रथम सातारा शहर पोलीस ठाण्यात डिटेक्टिव्ह ब्रँचला काम केल्यानंतर कराड शहर, महाबळेश्वर, कोरेगाव पोलीस ठाण्यात कर्तव्य बजावले. सध्या ते कोरेगाव तालुक्यातील रहिमतपूर पोलीस ठाण्यात पोलीस हवालदार म्हणून कामकाज पाहत होते. 21 जुलैला त्यांना धाप लागल्यामुळे सातारा जिल्हा रुग्णालयातील पोलीस चौकीत सहाय्यक फौजदार म्हणून काम करणारे त्यांचे बंधूंनी त्यांना तत्काळ जिल्हा रुग्णालयात दाखल केले होते.
21 ते 24 जुलैदरम्यान त्यांच्यावर तेथील कोरोना सेंटरमध्ये उपचार करण्यात आले. त्यांचे दोन्ही अहवाल निगेटिव्ह आल्यानंतर एन्जिओग्राफी करण्यासाठी त्यांना सातारा येथील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्या ठिकाणी त्यांची कोरोना टेस्ट केली असता, त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यामुळे त्यांच्यावर उपचार सुरू होते. उपचार सुरू असताना मंगळवारी त्यांचा मृत्यू झाला. जिल्हा पोलीस दलातील सलग दुसरा योद्धा गमावल्यामुळे हळहळ व्यक्त होत आहे.