सातारा - गुगल-पे कस्टमर केअरमधून बोलत असल्याची बतावणी करून रिचार्जसाठी गेलेली रक्कम परत मिळवून देण्याच्या बहाण्याने 'एनी डेस्क' हे अॅप्लिकेशन मोबाईलमध्ये डाऊनलोड करायला सांगितले. त्या आधारे बॅंक खात्यातील सुमारे १ लाख रुपये लुटण्याचा प्रकार साताऱ्यात उघडकीस आला आहे.
याप्रकरणी वैशाली सुधीर कांबळे (रा. विलसापूर, सातारा) यांनी दिलेल्या तक्रारीवरून अरविंद कुमार नावाच्या व्यक्तीविरोधात शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेली माहितीनुसार, गुरुवारी वैशाली कांबळे यांच्या मोबाईलवर अज्ञाताचा फोन आला. समोरून बोलणाऱ्या व्यक्तीने गुगल-पे कस्टमर केअर सेंटरमधून अरविंद कुमार बोलत असल्याचे सांगितले. रिचार्ज करण्यासाठी गेलेले पैसे परत मिळवण्यासाठी तुम्हीं मोबाईलमध्ये 'एनी डेस्क' हे अॅप्लिकेशन डाऊनलोड करा, असे सांगितले. त्याने सांगितल्याप्रमाणे कांबळे यांनी त्यांच्या मोबाईलमध्ये 'एनी डेस्क' हे अॅप्लिकेशन डाऊनलोड केले. त्यानंतर त्या अॅप्लिकेशन माध्यमातून कांबळे यांच्या बॅंक खात्यातील ९८ हजार ४६२ रुपये परस्पर काढून घेतल्याचे निदर्शनास आले. पुढील तपास सातारा पोलीस करत आहेत.