सातारा - अज्ञात वाहनाने धडक दिल्याने दुचाकीवरील युवक ठार झाल्याची घटना घडली आहे. ही घटना मलकापूर (ता. कराड) येथे घडली. सूरज संजय चौगुले (वय - 23, रा. जखीणवाडी, ता. कराड) असे मृत तरुणाचे नाव आहे. तर 1 जण गंभीर जखमी झाला आहे. दुचाकीला धडक दिल्यानंतर वाहन चालकाने वाहनासह घटनास्थळावरून पलायन केले.
हेही वाचा - 'सीएसटी' परिसरातील रस्त्यांचे रूप पालटणार; पालिकेचा न्यूयॉर्कच्या पार्श्वभूमीवर प्रकल्प
सुरज चौगुले व अन्य एकजण दुचाकीवरून कराडकडे येत होते. यावेळी पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर कृष्णा रुग्णालयासमोरील उड्डाणपुलावर अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. त्यामुळे दुचाकीवरील दोघेही महामार्गावर पडले. दुचाकीला धडक देणारे वाहन घटनास्थळी न थांबता पुढे निघून गेले. अपघात पाहून नागरिकांनी जखमींना कृष्णा रूग्णालयात दाखल केले. मात्र, सूरज चौगुले या युवकाचा उपचारापुर्वीच मृत्यू झाला होता. तर अपघातातील दुसर्या जखमीचे नाव समजू शकले नाही.