सातारा - जिल्ह्यातील वाई तालुक्यातील आसले येथील एक ७० वर्षीय कोरोनाबाधित आणि जांबळी येथील एका ५२ कोरोना संशयित रुग्ण, अशा दोघांचा मृत्यू झाला आहे. हे दोघेही मुंबईवरून परतले होते. तसेच मृत्यू झालेली ७० वर्षीय व्यक्तीचा अहवाल रविवारी कोरोनाबाधित आला होता, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली.
दोघेही मुंबईवरून परतले होते. दोघेही मधुमेह आजाराने ग्रासलेले होते. त्यांना श्वसनाचा त्रास होत असल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, आज क्रांतीसिंह नाना पाटील रुग्णालयात त्यांचा मृत्यू झाला. ७० वर्षीय व्यक्ती कोरोनाबाधित असल्याचे स्पष्ट झाले होते. मात्र, ५२ वर्षीय व्यक्तीने नमुने तपासणीसाठी पाठवले असून अहवाल अद्याप यायचा आहे, असे डॉ. गडकरी यांनी सांगितले. दरम्यान, साताऱ्यात कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या ८ वर पोहोचली आहे.
184 जणांचे नमुने तपासणीला -
क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालयातील 12, ग्रामीण रुग्णालय वाई 64, वेणूताई चव्हाण उप जिल्हा रुग्णालय कराड येथील ५५, उपजिल्हा रुग्णालय फलटण येथील ४८ व ग्रामीण रुग्णालय कोरेगाव येथील ५ अशा एकूण १८४ संशयित नागरिकांच्या घशातील स्त्रावांचे नमुने पुणे येथे तपासणीसाठी पाठविले आहेत, असे डॉ. गडीकर यांनी सांगितले.