सातारा - महाबळेश्वरच्या गोल्फ मैदानावर ईव्हीनिंग वाॅक घेतानाचा प्रसिध्द उद्योगपती व कुटुंबियांचा व्हिडिओ व्हायरल झाला. त्याची दखल घेत महाबळेश्वर पालिकेने दि क्लब या संस्थेच्या सचिवांना नोटीस बजावली आहे. नोटीस मिळताच क्लब व्यवस्थापनाने मैदानावर प्रवेशबंदी केली आहे.
दि क्लब व्यवस्थापनाकडून मैदान बंद
महाबळेश्वर पालिकेच्या मुख्याधिकारी पल्लवी पाटील यांनी या वृत्तास दुजोरा दिला. पालिकेने बजावलेल्या नोटीसीनुसार 'दि क्लब'ने गोल्फ मैदानाला टाळे ठोकले आहे. तसेच ही नोटीस प्रवेश द्वारावर लावून नागरीकांना आजपासून (दि. 3 मे) हे मैदान बंद करण्यात आले असल्याचे सूचित केले आहे.
उद्योगपतींचे महाबळेश्वरप्रेम
महाराष्ट्राचे नंदनवन म्हणून महाबळेश्वर हे प्रसिध्द आहे. तेथील थंड हवा आणि निसर्ग पाहण्यासाठी देशातील अनेक नामवंत नेहमी आपल्या कुटूंबासह तेथे वरचेवर जात असतात. यामुळे अनेक उद्योगपतींचे महाबळेश्वरवर नितांत प्रेम आहे.
काय म्हटलय पालिकेच्या नोटीसीत
पालिकेने बजावलेल्या नोटीसीत म्हटले आहे की, "सार्वजनिक ठिकाणी जॉगिंग किंवा फिरण्यास मनाई करण्यात आलेली आहे. परंतु आपल्या मिळकतीमधील गोल्फ कोर्स व ड्रायव्हिंग रेंज येथे मॉर्निंग व इव्हिनिंग वॉकसाठी मोठ्या प्रमाणात नागरिक येत असल्याचे निदर्शनास आले आहे. तरी नोटीस मिळाल्यापासून आपल्या मिळकतीमध्ये मॉर्निंग व इव्हीनिंग वाॅकसाठी येणाऱ्या नागरिकांना मनाई करण्यात यावी. अन्यथा आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 चे कलम 51 ते 60 व भारतीय दंड संहिता (45 ऑफ 1860) कलम 188 नुसार तसेच भारतीय साथ रोग अधिनियम 1897 अन्वये दंडनीय कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
हेही वाचा - कोरोनाबाधित रुग्णांच्या मदतीसाठी युवक काँग्रेसची हेल्पलाईन