सातारा - कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर नरवणे गावातील एका जोडप्याने अगदी साध्या पद्धतीने विवाह केला. विवाहाचा खर्च टाळून त्यांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी 25 हजार रुपयांची मदत केली. अरूण आणि सपना असे या जोडप्याचे नाव आहे.
नरवणे येथील सपना काटकर ही कुकुडवाडच्या माध्यमिक शाळेत शिक्षिका म्हणून काम करते. तर खुटबाव येथील आनंदा बाजीराव शिंदे हे पुणे येथील खासगी कंपनीत नोकरी करतात. या दोघांचा विवाह नोव्हेंबरमध्ये जुळला होता. मे महिन्यात विवाह सोहळा करण्याचा निर्णय दोन्ही कुटुंबियांनी घेतला. मात्र, कोरोना प्रदुर्भावाच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र लॉकडाऊन झाले.
आनंदा आणि सपना यांनी हा विवाह ठरलेल्या दिवशी आणि ठरलेल्या वेळीच करण्याचा निर्णय घेतला. सोशल डिस्टन्सिंग आणि इतर आवश्यक नियमांचे काटेकोर पालन करून हा विवाह करू असे ठरवण्यात आले. त्यानुसार नरवणे जवळच्या जाधववाडीतील खंडोबा मंदिरात अगदी साध्या पद्धतीने हा विवाह गुरुवारी दुपारी संपन्न झाला. या विवाहासाठी अगदी मोजकेच वऱ्हाडी उपस्थित होते.
साध्या पद्धतीने विवाह करून लग्नासाठी होणारा खर्च मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी देण्याचा निर्णय वधू-वराने घेतला. त्यानुसार दहिवडीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रमोद दीक्षित यांच्याकडे 25 हजार रुपयांचा डीडी सुपूर्त करण्यात आला. यावेळी नरवणेचे पोलीस पाटील विजयसिंह काटकर हेही उपस्थित होते.