सातारा - लग्नाच्या रात्रीच नववधूने सव्वा लाख रूपयांची रोख रक्कम आणि सोन्याच्या दागिन्यांसह सुमारे दोन लाखांच्या ऐवज घेऊन पोबारा केला. भुरकवडी (ता.खटाव) येथे ही घटना घडली आहे. या प्रकरणी पोलिसांनी आठ जणांना अटक केली असून त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे. याबाबत विशाल दिनकर जाधव (रा. भुरकवडी,ता.खटाव) यांनी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
फिर्यादीत दिलेल्या माहितीनुसार, विशाल हे भुरकवडी येथे आई लक्ष्मी, वडील दिनकर आणि बंधू तुषार असे एकत्र राहतात. विशाल यांच्या लग्नासाठी गेल्या एक वर्षापासून वधू संशोधन सुरू केले होते. सोमवारी (ता.२७ जुलै) रोजी त्यांचे नातेवाईक सचिन गुलाबराव घाडगे (रा. खटाव) यांच्याशी त्यांची चर्चा झाली. त्यांनी करंडी (ता. शिरूर जि. पुणे) येथे एक मुलगी असल्याचे सांगितले आणि तिचे छायाचित्र दाखवले. तसेच, कदम यांचे नातेवाईक प्रविण लावंड, काशिनाथ जाधव, रमेश जाधव, सुर्यकांत लावंड, अंकुश लावंड (सर्वजण रा. भुरकवडी) यांना मुलीची हकीकत सांगितली.
हेही वाचा - केंद्रीय निवडणूक आयुक्त अशोक लवासांचा राजीनामा
वधू पूजा शिवाजी शिंदे (वय,२४,रा.करंडी,जि.पुणे) ही चार वर्षांची असताना तिचे आई-वडीलांचा मृत्यू झाला होता. तसेच तिचे जवळचे कोणी नातेवाईक नसल्याने ती सध्या हडपसर येथे बहीण वैशाली सोमनाथ ताकवले हिच्याकडे राहत आहे. तसेच तिचे जवळचे कोणी नातेवाईक नसल्याने लग्न करण्यासाठी खर्च करण्याची ऐपत नसल्याचे सांगितले.
वधू पूजा ही आम्हाला पसंत असल्याचे जाधव कुटुंबियांनी सांगितल्यानंतर सोमवारी (ता.१०) रोजी सचिन घाडगे यांच्या ओळखीतील रविंद्र सुदाम जाधव (रा.बसाप्पाचीवाडी,वडूथ), रोशन इन्नूस तांबोळी, इन्नूस अमिर तांबोळी (रा. १०८ घर नं. २०१/२८ चोटी मस्जिद जवळ, रामनगर, हडपसर,पुणे), वर्षा रमेश फडतरे (रा. बुध्द विहार जवळ,सिद्धार्थनगर, मोहोळ, जि.सोलापूर) हे वधू पूजा तिची बहिणी वैशाली यांच्यासह सायंकाळी सात वाजता भुरकवडी येथे आले. त्यांनी जाधव यांच्या घर आणि शेतीची पाहणी केली. त्यानंतर मंगळवारी (ता.११) या वधू वरांचा विवाह घेण्याचे दोन्ही बाजूंकडून निश्चित झाले.
मंगळवारी सकाळी अकरा वाजता भुरकवडी येथे जाधव यांच्या राहत्या घरी विशाल आणि पूजा यांचा रितीरिवाजाप्रमाणे घरगुती स्वरूपात हा विवाह करण्यात आला. त्यानंतर वधू पूजा हिच्यासोबत आलेले सचिन घाडगे, रविंद्र जाधव, रोशन तांबोळी, इनूस तांबोळी, वर्षा फडतरे हे निघून गेले. तर, वधू पूजा व तिची बहिण वैशाली ताकवले या दोघी राहिल्या होत्या. रात्री जेवण करून सर्व कुटुंबीय झोपल्यानंतर बुधवारी (ता.१२) रात्री सव्वा बारा वाजता वैशाली ताकवले ही घरातून बाहेर येऊन उलटी करत होत्या. त्यावेळी त्यांनी आपणांस अपचन आणि पित्त झाले असून तुम्ही झोपा असे सांगितले.
हेही वाचा - धक्कादायक..! ऑक्सिजन सिलिंडरचा आवाज येत असल्याने पुण्यातील एका रुग्णालयावर दगडफेक
त्यानंतर रात्री दीड वाजण्याच्या सुमारास आपण जागे झालो असता पूजा व तिची बहिण वैशाली या दोघी रात्री दिसून आल्या नाहीत. त्यामुळे आपण त्यांची शोधाशोध केली असता त्या आढळून आल्या नाहीत तसेच घरातील साहित्याची पाहणी केली असता रोख रक्कम व सोन्याचे दागिने आढळून आले नाहीत. १ लाख २५ हजार रूपयांची रोख रक्कम, ६० हजार रूपये किंमतीचे आई लक्ष्मी यांच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र तसेच वधू पूजा हिला लग्नात घातलेले १५ हजार रूपये किंमतीचे अर्धा तोळा वजनाचे मंगळसुत्र, असा एकूण २ लाख रूपयांचा ऐवज लंपास झाल्याचे लक्षात आले.
या प्रकरणी सचिन घाडगे, रविंद्र जाधव, रोशन तांबोळी, इनूस तांबोळी, वर्षा फडतरे, पूजा शिंदे /करिश्मा महादेव सासणे (रा.रूई कांचन,सोरतापवाडी, सोरतापेश्वर कॉलनी, ता.हवेली,पुणे), वैशाली ताकवले, अनिकेत मोहन घोलप (रा. बाळे, जि. सोलापूर) या आठ आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांना न्यायालयात हजर केले असता त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी बी.बी.महामुनी, सहाय्यक पोलीस निरीक्षक मालोजीराव देशमुख यांनी ही कारवाई केली.