सातारा - विविध कोरोना केअर सेंटर तसेच उपजिल्हा रुग्णालयांत संशयित म्हणून भरती असणाऱ्या 35 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. यामुळे जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या ५५६ वर गेली आहे. संशयित व्यक्तींना इन्फ्लूएन्झाची लक्षणे होती. यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींचे ट्रेसींग सुरू झाले आहे. तसेच कोणतीही लक्षणे आढळल्यास या व्यक्तींना क्वारंटाइन करण्यात येत आहे.
जिल्ह्यात अद्याप 336 कोरोनाबाधित विविध सरकारी रुग्णालयात उपचार घेत आहेत. तर आतापर्यंत २१ जणांचा मृत्यू झालाय. या व्यतिरिक्त एकूण बाधितांपैकी २०० कोरोनाबाधित पूर्णपणे बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आलाय. जिल्ह्यातील संचारबंदी उठवण्यात आली असून लॉकडाऊनच्या पाचव्या टप्प्यात नियमांमध्ये मोठ्या प्रमाणात शिथिलता देण्यात आली आहे.