सातारा - माण तालुक्यातील दहिवडी शहरात ७१ कोरोनाबाधित रुग्ण सापडले आहेत. त्यापैकी ४६ जण घरी विलगीकरणात आहेत. तर २५ जणांवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. कोरोनाला अटकाव करण्यासाठी संपुर्ण शहर व परिसरातील वाड्या व वस्त्या प्रतिबंधीत क्षेत्र (कन्टेनमेंट झोन) घोषित झाले आहे.
दहिवडीत एकाचवेळी ७१ रुग्ण कोरोनाबाधित वाढल्याने चिंता वाढली आहे. शनिवार, रविवार व सोमवार या दिवशी शहरात कडकडीत बंद पाळण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार तीन दिवस बंद पाळण्यात आला. मात्र परिस्थितीचे गांभीर्य पाहून आज पुन्हा प्रांताधिकारी शैलेश सुर्यवंशी यांच्या उपस्थितीत बैठक झाली.
हेही वाचा-औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील यांना कोरोना; ट्विट करून दिली माहिती
१० दिवसांसाठी गाव कन्टेंटमेंट झोन-
जास्तीत जास्त संशयितांच्या कोरोना चाचण्या करण्याचा प्रशासनाने निर्णय घेतला आहे. रुग्णांची संख्या पाहता संपूर्ण शहर कन्टेनमेंट झोन घोषित करण्यात यावा, असा निर्णय प्रातांधिकाऱ्यांनी घेतलेल्या बैठकीत घेतला आहे. पुढील दहा दिवसांसाठी कन्टेनमेंट झोनमधील सर्व प्रतिबंध शहरात लागू करण्यात आले आहेत. नियम मोडणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला. जीवनावश्यक वस्तू नागरिकांना घरपोच कशा देता येतील याबाबत चर्चा करण्यात आली.
हेही वाचा-मुख्यमंत्र्यांच्या आवाहनाला काँग्रेसकडून हरताळ! तर 50 लोकांच्या वर प्रवेश नाही - नाना पटोले
नागरिकांकडून सहकार्याची अपेक्षा
परिस्थिती गंभीर असली तरी आपण त्यावर नियंत्रण मिळवू शकतो. नागरिकांनी घाबरून न जाता आपल्या व इतरांच्या जीवनाच्या सुरक्षेसाठी प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन म्हसवडचे नगराध्यक्ष धनाजी जाधव यांनी केले आहे. शहरातील परिस्थिती गंभीर असून कोरोनावर नियंत्रण मिळविण्यासाठी कठोर पावले उचलण्यात येत आहेत, असे दहिवडीचे प्रांताधिकारी शैलेश सुर्यवंशी यांनी सांगितले. शहरातील कोरोनाबाधितांची वाढती संख्या प्रशासनाची डोकेदुखी बनली आहे. शहरातील कोरोनाच्या उद्रेकाने धास्तावलेल्या प्रशासनाने कठोर पावले उचलण्याचा निर्णय घेतला. अपवाद वगळता दररोज लक्षणीय संख्येने कोरोनाग्रस्त आढळून येत आहेत.
प्रशासनाच्या सूचनेप्रमाणे सहकार्य करून कारवाई टाळण्याचे आवाहन पोलीस निरीक्षक राजकुमार भुजबळ यांनी केले आहे.
राज्यात कोरोनाबाधितांची वाढली संख्या-
राज्यात कोरोनबाधितांची वाढती संख्या हा चिंतेचा विषय झाला आहे. राज्यात गेल्या २४ तासांत ५२१० कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. या संदर्भात राज्य शासनाने तातडीने निर्णय घेत अमरावती विभागातील अनेक जिल्ह्यांत संचारबंदी लागू केली आहे. दुसरीकडे, पुण्यात शाळा व महाविद्यालये बंद करण्यात आले आहेत.