सातारा - राष्ट्रवादी काँग्रेसचे मिशन विधानसभा सुरू झाले आहे. त्याचाच भाग म्हणून पाटण तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने गुढे-तळमावले येथे रविवारी ( दि. २८) राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला आहे. मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यानंतर विरोधी पक्षनेते अजित पवार पाटण तालुक्यात येत आहेत. त्यामुळे अजितदादा काय बोलणार, याची राजकीय वर्तुळात उत्सुकता आहे.
मान्यवरांच्या उपस्थितीत मेळावा - विधान परिषदेचे माजी सभापती, आ. रामराजे नाईक-निंबाळकर, खा. श्रीनिवास पाटील, माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर, माजी सहकार मंत्री बाळासाहेब पाटील, आ. शशिकांत शिंदे, आ. मकरंद पाटील, आ. दीपक चव्हाण, माहिती-तंत्रज्ञान विभागाचे प्रदेशाध्यक्ष सारंग पाटील, माजी सनदी अधिकारी प्रभाकर देशमुख, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुनील माने, दीपक पवार आदी मान्यवरांच्या उपस्थितीत मेळावा होणार असल्याची माहिती पाटण तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष राजाभाऊ शेलार यांनी दिली आहे.
पाटण मतदार संघावर लक्ष - राष्ट्रवादीच्या स्थापनेवेळी शरद पवारांबरोबर जाणारे विक्रमसिंह पाटणकर हे सातारा जिल्ह्यातील पहिले नेते होते. त्यामुळे त्यांना शरद पवारांचे निकटवर्तीय मानले जाते. पाटणकर यांनी ३० वर्षे पाटण मतदार संघाचे नेतृत्व केले. २००४ साली त्यांचा पराभव झाला. आगामी निवडणुकीत या मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचा झेंडा फडकण्यासाठी यानिमित्ताने पेरणी करण्यात येण्याची शक्यता आहे. त्यानुसार कुणाता तिकीट देता येईल. त्याचा पक्षाला कसा फायदा होईल. याचीही चाचपणी यानिमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेस करणार असे संकेत मिळत आहेत. निर्णय नंतर घेतला जाईल. मात्र या बैठकीत काही नावे पुढे येण्याची शक्यता आहे.
शंभूराज देसाईंना राष्ट्रवादी घेरणार - मूळच्या शिवसेनेतून शंभूराज देसाई २००४ लाख पहिल्यांदा आमदार झाले. २००९ ला विक्रमसिंह पाटणकरांनी शंभुराजेंचा पराभव केला. मात्र, पुन्हा आमदार झाले. २०१४ आणि २०१९ ला विक्रमसिंह पाटणकर यांचे सुपुत्र सत्यजितसिंह पाटणकर यांचा शंभूराज देसाईंनी पराभव केला. राष्ट्रवादीचा आता पाटण मतदार संघावर वर्चस्व मिळवायचे आहे. त्यासाठी शंभूराज देसाईंना घेरण्याची तयारी राष्ट्रवादीने सुरू केली आहे.