सातारा - सातारा जिल्हा बँक निवडणुकी(satara DCC bank election)त एका मताने पराभव झालेल्या आमदार शशिकांत शिंदे (MLA shashikant shinde) यांच्या समर्थकांनी साताऱ्यातील राष्ट्रवादीच्या कार्यालयावर दगडफेक केली. या दगडफेकप्रकरणी शशिकांत शिंदे यांनी काही तासातच माफी मागितली आहे.
'मी पक्षाचा सच्चा कार्यकर्ता'
शशिकांत शिंदे म्हणाले, की मी माझ्या कार्यकर्त्यांना आवाहन करेन, ज्या नेत्यांनी मला राजकीय क्षेत्रात उभे केले, त्या पक्षाविरोधात चुकीची भूमिका घेऊ नका. ही भूमिका योग्य नाही, मी जाहीर माफी मागतो, शरद पवार, अजितदादा, सुप्रिया ताई यांची माफी मागतो. भावनेच्या भरात कार्यकर्त्यांनी काही केले असेल तर दिलगिरी व्यक्त करतो. मी पक्षाचा सच्चा कार्यकर्ता आहे, हे शरद पवार यांना माहिती आहे. एकनिष्ठ आहे, मी त्यांच्यासाठी जीव देईन, फक्त माझी एकच भूमिका असेल कार्यकर्त्यांनी अशी भूमिका घेऊ नये."
'पराभवामागे मोठे कारस्थान'
मी एका मताने पराभूत झालो, तो स्वीकारतो, माझ्यासाठी पवारसाहेब, अजितदादा यांनी प्रयत्न केले. माझ्या पराभवामागे फार मोठे कारस्थान होते. ते येत्या काळात समोर येईल, माझा गाफीलपणा मला नडला, त्यामुळे माझा पराभव झाला, असे शशिकांत शिंदे म्हणाले.