सातारा : राज्यात भाजप विरोधात महाविकास आघाडीची मोट घट्ट होत असताना सातारा जिल्ह्यात मात्र महाविकास आघाडीत बिघाडी होताना पाहायला मिळत आहे. काँग्रेसच्या ताब्यात असलेल्या कराड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सत्तेसाठी राष्ट्रवादीने भाजपसोबत घरोबा केला आहे. परंतु, हा घरोबा भाजपमधील इतरांच्या पचनी पडलेला नाही. त्यामुळेच भाजपचा दुसरा गट या घरोब्याविरोधात आहे.
काय आहे बाजार समितीचा इतिहास? : कराड शेती उत्पन्न बाजार समितीवर 40 वर्षाहून अधिक काळ काँग्रेसचे दिवंगत नेते, माजी मंत्री विलासकाका उंडाळकर यांची एकहाती सत्ता होती. या सत्तेला सुरूंग लावण्यासाठी 2008 मध्ये कराड तालुक्यातील काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजपमधील सर्व उंडाळकर विरोधकांनी महाविकास आघाडी स्थापन करून बाजार समितीत सत्तांतर घडविले होते. परंतु, त्यानंतर झालेल्या कृष्णा कारखान्याच्या निवडणुकीत उंडाळकर गटाच्या मदतीने भोसले गटाने कारखान्याची सत्ता हस्तगत केली. त्या मदतीच्या बदल्यात बाजार समितीच्या निवडणुकीत भोसले गटाने उंडाळकर गटाला मदत केली आणि उंडाळकर गटाने पुन्हा बाजार समितीची सत्ता काबीज केली.
महाराष्ट्र केसरी पै. संजय पाटलांची हत्या : कराड बाजार समितीत २००८ सालाच्या अखेरीस महाविकास आघाडीच्या माध्यमातून झालेल्या सत्तांतरानंतर 15 जानेवारी 2009 ला महाराष्ट्र केसरी पै. संजय पाटील यांची हत्या झाली होती. त्या निवडणुकीत पै. संजय पाटील यांनी मनगटशाही आणि पैशाचा वारेमाप वापर केल्याची चर्चा अनेक दिवस होती. पै. संजय पाटील यांच्या हत्येचा खटला देखील राज्यभर गाजला होता. विलासकाका उंडाळकर यांचे पूत्र अॅड. उदयसिंह पाटील-उंडाळकर यांना या खटल्यात मुख्य आरोपी करण्यात आले होते. त्यातून त्यांची निर्दोष मुक्तता झाली होती.
राष्ट्रवादी-भाजप आघाडीला विरोध : कराड तालुक्यातील शेतकर्यांची अर्थवाहिनी असलेल्या बाजार समितीच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादीचे कराड उत्तरचे आमदार तथा माजी सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांनी पुढाकार घेतला आहे. त्यासाठी कराड दक्षिणमधील भाजपचे प्रदेश सरचिटणीस डॉ. अतुल भोसले यांच्या मदतीने पॅनेलची जुळवाजुळव सुरू आहे. येत्या विधानसभा निवडणुकीत कराड उत्तरमध्ये ज्यांच्या विरोधात भाजप लढणार आहे, त्या राष्ट्रवादीशीच कराड दक्षिणमधील भाजप नेत्याने आघाडी केल्यामुळे या आघाडीला कराड उत्तरमधील भाजप नेत्यांचा विरोध आहे.
चव्हाण-उंडाळकर गटाची युती घट्ट : कराड बाजार समितीच्या निवडणुकीत राष्ट्रवादी-भाजप आघाडीला शह देण्यासाठी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हा आणि उंडाळकर गटाची मोट पक्की झाली आहे. बाजार समितीच्या निवडणुकीचा मोठा परिणाम येणार्या विधानसभा निवडणुकीत दिसणार आहे. त्यामुळे ही निवडणूक काँग्रेससाठी महत्वाची आहे.
महाविकास आघाडीत उमेदवारीवरून नाराजी : तालुक्यातील महत्वाच्या संस्थांच्या निवडणुकीत ठराविक चेहर्यांना मिळणारी उमेदवारी ही महाविकास आघाडीसाठी डोकेदुखी ठरणार आहे. प्रत्येक निवडणुकीत कृष्णाकाठावरील वाळू, क्रशरवाले तसेच पगारी पुढारी उमेदवारी अर्ज दाखल करतात. त्यांनाच उमेदवारी दिली जाते. यामुळे महाविकास आघाडीतील अन्य इच्छुकांमध्ये सध्या मोठी नाराजी पाहायला मिळत आहे.