कराड (सातारा) - एकेकाळी प्रसिध्द असलेल्या आणि सध्या बंद अवस्थेत असलेल्या वारणा हॉटेलमध्ये मुस्लिम बांधवांनी सुसज्ज कोविड सेंटर उभारले आहे. सातार्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या हस्ते या कोविड सेंटरचे उद्घाटन करण्यात आले. मुस्लिम बांधवांप्रमाणे सामाजिक संस्थांनी अशी सेंटर्स उभारण्यासाठी पुढाकार घेण्याचे आवाहन पाटील यांनी यावेळी केले.
यावेळी जिल्हाधिकारी शेखर सिंह, कराडच्या नगराध्यक्षा रोहिणी शिंदे, मलकापूरचे उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे, प्रांताधिकारी उत्तम दिघे, तहसीलदार अमरदीप वाकडे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक बी. आर. पाटील, तालुका वैद्यकीय अधिकारी संगीता देशमुख, नगरसेवक फारुख पटवेकर, मजहर कागदी, अल्ताफ शिकलगार, राजू इनामदार, इसाक सवार यांच्यासह मुस्लीम समाजातील मान्यवर उपस्थित होते.
कराड शहर आणि ग्रामीण भागात दिवसेंदिवस वाढत असलेली कोविड रूग्णसंख्या लक्षात घेऊन मुस्लिम बांधवांनी वारणा कोविड सेंटरमध्ये सर्व सोयी-सुविधा उपलब्ध केल्या आहेत. त्यामुळे रुग्णांना तातडीचे उपचार मिळतील. सामाजिक संस्थांनी पुढाकार घेऊन कोविड सेंटर्स उभारण्याची गरजही पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी व्यक्त केली.
जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी मुस्लिम बांधवांचे कौतुक करून जनतेच्या सोयीसाठी शासनाने या कोविड सेंटरला सर्वोतोपरी मदत केल्याचे सांगितले. सामाजिक संस्थांनी कोविड सेंटर उभारल्यास त्यांनाही मदत केली जाईल, असेही जिल्हाधिकारी म्हणाले. या कोरोना केअर सेंटरमध्ये सकाळी सात वाजता नाश्ता, दुपारी एक वाजता जेवण, सायंकाळी पाच वाजता चहा, बिस्कीट तर रात्री आठ वाजता जेवण दिले जाणार आहे.
हेही वाचा - कोव्हिड सेंटरमध्ये काम करणाऱ्या महिला भाडेकरूस दिला त्रास; शेजाऱ्यांवर गुन्हा दाखल
हेही वाचा - केरळमध्ये नवीन प्रजातीच्या पालीचा शोध; साताऱ्यातील संशोधक डॉ.अमित सय्यद यांचे यश