सातारा - फलटण तालुक्यातील जाधववाडी येथे जेवताना शिवीगाळ केल्याच्या रागातून पारधी समाजातील संशयित आरोपीने सुनेचा चाकूने वार करून खून केल्याची घटना रविवारी आठ वाजण्याच्या सुमारास घडली.
फलटण शहराशेजारील उपनगर असलेल्या जाधववाडी येथे पवार कुटूंब वास्तव्यास आहे. रविवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास आम्रपाली शाम पवार (वय 23) हिचा संशयित आरोपी चांडवल झबझब पवार (वय 50) याने चाकूने वार करून खून केला. जेवणावेळी झालेल्या वादातून व शिवीगाळीतून ही घटना घडली.
नातेवाईकांनी संशयित आरोपीस लाकडी दांडक्याने मारहाण केल्यामुळे तोही गंभीर जखमी झाला आहे. याप्रकरणी कविता चांडवल पवार (वय 45) हिने फलटण शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून पोलिसांनी भादंवि 302 अन्वये गुन्हा दाखल केला आहे. आरोपीस लाकडी दांडक्याने मारहाण केल्याप्रकरणी मयत व इतर नातेवाईकांवर भादंवि 307 अन्वये परस्परविरोधी तक्रार दाखल करण्यात आली आहे. खूनप्रकरणी संशयित असलेल्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याबाबतचा अधिक तपास फलटण शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक पोमण करत आहेत.