सातारा - देशाची राजधानी दिल्लीतील सर्व व्यवहार सुरळीत सुरू आहेत. मग फक्त सातारा जिल्ह्यालाच कोरोना संसर्गाचा धोका आहे काय? अशी तोफ डागत खासदार उदयनराजे भोसले यांनी सातारा जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त केली आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेली चार महिने टाळेबंदी आहे. त्यामुळे सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे. असे असताना सातारा जिल्हाधिकार्यांकडून वारंवार टाळेबंदी जाहीर केली जात आहे. याबाबत खासदार उदयनराजे भोसले यांनी जाहीरपणे नाराजी व्यक्त केली आहे. खासदार भोसले म्हणाले, की देशात सर्वत्र कोरोनाचे रुग्ण सापडत आहेत. मुंबई, पुणे व दिल्लीसारख्या महानगरांतही लाखो-हजारोंच्या संख्येने कोरोनाचे रुग्ण सापडले आहेत. असे असताना या शहरांमधील सर्व व्यवहार सुरळीत चालले आहेत. मग सातार्यातच टाळबंदी का?
सकाळी 9 ते दुपारी 2 च्या दरम्यान कोरोना येणार नाही का?
टाळेबंदीमुळे सर्वसामान्य सातारकरांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. हाताला काम नसल्याने लोक खाणार काय? सकाळी 9 ते दुपारी 2 च्या दरम्यान टाळेबंदीमध्ये शिथिलता दिली आहे. या दरम्यान कोरोना येणार नाही काय? तुम्ही जेवढे दाबून ठेवाल, तेवढ्या ताकदीने त्याचा विस्फोट होतो. हे सातार्यात वेळोवेळी सिद्ध झाले आहे. याचा विचार करून जिल्हाधिकार्यांनी आपल्या अधिकाराचा वापर सर्वसामान्यांच्या हितासाठी करावा. सर्वसामान्य शेतकरी, गोरगरीबांना प्रशासनाने मदत करावी, अशी अपेक्षा खासदार उदयनराजे यांनी केली.
लोकप्रतिनिधींना विश्वासात घ्या..
यापुढील काळात जिल्हाधिकार्यांनी कोणताही निर्णय घेण्यापूर्वी लोकप्रतिनिधींना विश्वासात घ्यावे. कोरोनाला रोखण्याची जबाबदारी केवळ जिल्हाधिकार्यांनी नाही. तर जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींसह जनतेची जबाबदारी आहे. सकाळी 9 ते दुपारी 2 पर्यंत कोरोना येत नाही, असा जावईशोध लावण्यात आला आहे. त्यापेक्षा जनतेचे प्रबोधन करून कोरोनाचे उच्चाटन शक्य असल्याचा टोमणावजा सल्लाही खासदार भोसले यांनी जिल्हाधिकारी शेखर सिंह यांना दिला आहे.
घोषणेवरून नुकताच उदयनराजे देशभरात आले चर्चेत
राज्यसभेत शपथ घेताना भाजपचे खासदार उदयनराजे भोसले यांनी 'जय भवानी जय शिवाजी' अशी घोषणा दिली होती. मात्र, सभापती तथा उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी यावर आक्षेप घेत, कोणत्याही घोषणा न देण्याचे आवाहन नवीन राज्यसभा सदस्यांना केले होते. यावरून महाराष्ट्रात संतप्त प्रतिक्रिया उमटल्या आहेत. यावर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनीही प्रतिक्रिया दिली होती. त्यानंतर उदयनराजे भोसले यांनी सेनेवर निशाणा साधला होता.