सातारा : आम्ही आमच्या वेदना मांडण्यासाठी रायगडला चाललोय. त्याशिवाय दुसरे ठिकाणच नाही. छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधी स्थळावर जाऊन आम्ही आमच्या वेदना मांडू. त्यानंतर पुढे काय करायचं ते ठरवू, अशा शब्दांत छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज तथा खासदार उदयनराजे भोसले ( MP Udayanaraje Bhosale ) यांनी साताऱ्यात माध्यमांशी बोलताना आपली भूमिका स्पष्ट केली. तसेच समर्थकांसोबत ते रायगडाकडे रवाना झाले आहेत.
छत्रपतींची अवहेलना किती सहन करायची - उदयनराजे म्हणाले की, आज जग इतके व्यक्ती केंद्रीत झाले आहे की प्रत्येकाला आपल्या स्वार्थापलिकडे काहीच दिसत नाही. काही लोक छत्रपती शिवाजी महाराजांची अवहेलना करत आहेत. हे किती सहन करायचे. म्हणून आम्ही शिवसन्मान निर्धाराचे आयोजन केले आहे. कारण, छत्रपतींचा सन्मान म्हणजे समस्त महापुरुषांचा सन्मान आहे.
त्याची बुद्धी भ्रष्ट झाली असेल - माझ्याशी कोणीही बोललेले नाही. त्यांना जे योग्य वाटेल ते करतील. मला जे योग्य वाटते ते मी करतो, असे उदयनराजे यांनी स्पष्ट केले. चांगले काम करणाऱ्यांशी शिवाजी महाराजांची तुलना करणे गैर नाही, असे कोणी म्हणाले. आता दुसरे पण म्हणतील. त्यामुळे ते विचारवंत असतील किंवा त्यांची बुद्धी भ्रष्ट झाली असेल. शिवाजी महाराजांची बरोबरी कोणीच करू शकत नाही. लोकं कोडगी झाली आहेत. सर्व पक्षांच्या प्रमुखांनी आपल्या नेते, कार्यकर्त्यांना चांगले-वाईट कशात आहे, ते सांगितलं पाहिजे.