सातारा - तौक्ते चक्रीवादळाचा फटका कराड आणि पाटण तालुक्यालाही बसला आहे. यात फळबागा, पिकांसह घरांच्या पडझडीमुळे मोठे नुकसान झाले आहे. या नुकसानीची आज (19 मे) खासदार श्रीनिवास पाटील यांनी प्रशासकीय अधिकार्यांसमवेत पाहणी केली. तसेच नुकसानीचे तातडीने पंचनामे करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत मिळवून देण्याच्या सुचनाही त्यांनी तहसीलदारांना दिल्या आहेत.
7 एकरावरील केळीच्या बाग उद्ध्वस्त
तौक्ते चक्रीवादळाचा सातारा जिल्ह्याला मोठा फटका बसला आहे. कराडसह पाटण तालुक्यातही मोठे नुकसान झाले आहे. चचेगाव (ता. कराड) येथील हणमंत हुलवान, साहेबराव पवार, विलास पवार यांनी सामूहिक पध्दतीने 7 एकरावर केलेली केळीची बाग वादळी पावसाने उद्ध्वस्त झाली आहे. या नुकसानीमुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत. उद्ध्वस्त बागेची अवस्था पाहून खासदार श्रीनिवास पाटील यांनादेखील गहिवरून आले. त्यांनी या शेतकर्यांशी सवांद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. कराडचे तहसीलदार अमरदीप वाकडे यांना नुकसानीचे तातडीने पंचनामे करून संबंधितांना मदत मिळवून देण्यास सांगितले.
घरांचीही पडझड
कराड तालुक्यातील येणके गावात जाऊन सतीश गुरव यांच्या पडझड झालेल्या घराचीही पाहणी श्रीनिवास पाटलांनी केली. त्यांच्या समवेत येणके गावचे सरपंच निकहत मोमीन, पोलीस पाटील प्रदीप गरुड, ग्रामसेविका रोहिणी जानकर होत्या. त्यानंतर पाटण तालुक्यातील चाळकेवाडी गावात जाऊन वादळामुळे नुकसान झालेल्या घरांची पाहणी श्रीनिवास पाटलांनी केली. यावेळी पाटणचे प्रांताधिकारी श्रीरंग तांबे, माजी जिल्हा परिषद सदस्य संजय देसाई, मारुती मोळावडे आणि सरपंच नंदा चाळके उपस्थित होत्या. तर, तौक्ते चक्रीवादळामुळे सातारा जिल्ह्यातील शेतीचे व घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यासंदर्भात केंद्र व राज्य शासनाकडे पाठपुरावा करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत मिळवून देणार असल्याचे खासदार श्रीनिवास पाटील यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले. दरम्यान, तौक्ते चक्रीवादळामुळे अरबी समुद्रात अडकलेल्या 185 जणांना आयएनएस कोचीकडून वाचवण्यात यश आले आहे. तर 34 मृतदेह सापडल्याचे समोर आले आहे.
हेही वाचा - जळगाव जिल्ह्यातील भाजप पदाधिकाऱ्याची पत्नी, मुलीसह आत्महत्या