कराड (सातारा) - कृष्णा हॉस्पिटलने कोरोनामुक्तीचे ९ वे शतक पुर्ण केले आहे. आतापर्यंत तब्बल ९१७ रुग्ण उपचार घेऊन कोरोनामुक्त झाले आहेत. कोरोनाच्या संकटकाळात कराडचे कृष्णा हॉस्पिटल हे खर्या अर्थाने संकटमोचक ठरले आहे. कोविड रुग्णांसाठी हॉस्पिटल प्रशासनाने स्वतंत्र वॉर्डसह बेड आणि व्हेंटिलेटरची व्यवस्था केली आहे.
कोरोना संकटाची व्याप्ती पाहून कृष्णा हॉस्पिटलने अनेक उपाययोजना केल्या. त्यामध्ये स्वत:ची प्रयोगशाळा सुरू केली. त्यासाठी शासनाची परवानगीही मिळविली. अत्याधुनिक उपकरणे खरेदी केली. त्यामुळे स्वॅबच्या नमुन्यांचा अहवाल तातडीने मिळू लागला. आता त्यापुढे पाऊल टाकत कृष्णा हॉस्पिटलने स्वतंत्र कोविड रूग्ण तपासणी ओपीडी सुरू केली आहे, अशी माहिती कृष्णा चॅरिटेबल ट्रस्टचे चेअरमन डॉ. सुरेश भोसले यांनी दिली.
दरम्यान, गणेशोत्सवादिवशी (शनिवारी) २४ जण कोरोनामुक्त झाले. त्यामध्ये कराड शहरातील ८, कराड तालुक्यातील ९, पाटण तालुक्यातील १, वाळवा तालुक्यातील ३, कोल्हापूर १, गहागर १, चिपळूण येथील १, अशा २४ जणांचा समावेश आहे. आतापर्यंत कृष्णा हॉस्पिटलमध्ये ९१७ रूग्ण कोरोनामुक्त होऊन घरी गेले आहेत.