सातारा- कोरोनाबाधित रुग्णाला घ्यायला गेलेल्या वाहनांवर जमावाने दगडफेक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर तालुक्यातील रांजणवाडी येथे हा प्रकार घडला आहे. यामध्ये जमावाने तीन वाहनांची तोडफोड करत आरोग्य कर्मचाऱ्यांना माघारी लावण्याचा प्रयत्न केला.
महाबळेश्वर तालुक्यातील रांजणवाडी येथील कोरोनाबाधित रुग्णाला कोरोना केअर सेंटरमध्ये घेऊन जाण्यासाठी नगरपालिका कर्मचारी आणि आरोग्यसेवक गेले होते. कोरोनाबाधित व्यक्तीच्या कुटुंबातील व्यक्तींनी रुग्णांवर घरातच उपचार करा, असा तगादा लावला. नागरिकांनीही कोरोना रुग्णाला घेऊन जाण्यासाठी आलेल्या कर्मचाऱ्यांना विरोध केला. यावेळी संतप्त जमावाने प्रशासनाच्या 3 वाहनांची तोडफोड केली.
जमावाने हातात काठ्या घेऊन कर्मचाऱ्यांवर हल्ला केल्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान, घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. नागरिकांनी नगरपालिका कर्मचाऱ्यांवर आणि वाहनांवर दगडफेक केल्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले.
सध्या तणाव निवळला असून गावात पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
दरम्यान, सातारा जिल्ह्यात गुरुवारी 165 कोरोनाबाधित रुग्ण वाढले आहेत. यामुळे जिल्ह्यातील एकूण रुग्णसंख्या 3826 वर पोहोचली आहे. गुरुवारी 49 रुग्ण कोरोनामुक्त झाल्यामुळे त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. कोरोनामुक्त झालेल्याची संख्या दोन हजारांच्या जवळ पोहोचली आहे. साताऱ्यात 1982 जण कोरोनामुक्त झाले आहेत. जिल्ह्यात 130 जणांचा मृत्यू झाला आहे.