कराड (सातारा) - महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या स्थापनेला 15 वर्षे पूर्ण झाल्याने मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशानुसार राज्यभरात सभासद नोंदणी अभियान सुरू करण्यात आले आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सभासद नोंदणी अभियानास मनसेचे जिल्हाध्यक्ष अॅड. विकास पवार यांच्या हस्ते रविवारी कराडमध्ये प्रारंभ झाला.
जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी मनसे -
सभासद नोंदणीला तरूण वर्गातून चांगला प्रतिसाद मिळत आहे. गेल्या पंधरा वर्षातील मनसेचे काम आणि चळवळ जनतेसमोर आहे. त्यामुळे कराडमध्ये सभासद नोंदणीस चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे जिल्हाध्यक्ष अॅड. विकास पवार यांनी सांगितले. जनतेचे प्रश्न व समस्या सोडवण्याचे आणि भक्कम विरोधी पक्ष म्हणून राज्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेना सक्षमपणे काम करीत आहे. राज्यात तीन पक्षाच्या सरकारचे त्रांगडे असल्याने जनतेचे प्रश्न सुटत नाहीत. अशावेळी मनसेकडून लोकांना अपेक्षा आहेत. त्या अपेक्षा पुर्ण करण्यासाठी मनसे काम करत आहे. सभासद नोंदणी अभियानाल मिळणार्या प्रतिसादातून लोकांचा मनसेवरील विश्वास स्पष्ट होत असल्याचा विश्वास मनसेचे शहराध्यक्ष सागर बर्गे यांनी व्यक्त केला. यावेळी मनसेचे पदाधिकारी महेश जगताप, दादा शिंगण, सागर बर्गे, सतीश यादव, नितीन महाडीक, संदीप लोंढे यांच्यासह मनसैनिक उपस्थित होते.
हेही वाचा - माजी आमदार संभाजी पवार यांचे निधन