सातारा : पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या घराशेजारील इमारतीवर खासदार उदयनराजे भोसले यांचे चित्र काढले जाणार होते. मात्र पोलिसांनी चित्रकाराला वेळीच ताब्यात घेतल्यामुळे साताऱ्यात तणाव तयार झाला. या वादात आता उदयनराजेंचे चुलत बंधू आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी उदयनराजे भोसले यांच्यावर टीका केली आहे. खासदार उदयनराजेंच्या पेंटिंगचा वाद हा जम्मू-काश्मीर आणि महाराष्ट्र-कर्नाटक सीमा वादापेक्षाही गहण असल्याची त्यांनी सांगितले आहे.
पेटिंगचा निर्णय राज्यसभा देईल : खासदारांच्या पेंटिंगचा वाद हा महाराष्ट्र-कर्नाटक आणि जम्मू-काश्मिरच्या वादापेक्षाही गहण आहे. खासदारांचे पेंटिंग कुठे काढायचे, याबाबत राज्यसभा निर्णय देईल, असा टोला देखील आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी लगावला आहे. तसेच हा सर्व बालिशपणाचा कळस असल्याची खिल्ली उडवत यातून काय साध्य होणार आहे, असा सवाल त्यांनी केला आहे.
अजिंक्यतारा किल्ल्यावर चित्र काढा : शिवेंद्रराजे म्हणाले की, समर्थकांना नेत्याने आवर घालायचा असतो. पण, नेताच चित्र कुठे काढायचे हे बघत रात्री-अपरात्री फिरत असेल आणि पोलिसांशी हुज्जत घालत असेल तर अवघड गोष्ट आहे. इमारतीच्या भिंतीवर चित्र काढण्यापेक्षा अजिंक्यतारा किल्ल्यावर चित्र काढा. म्हणजे हायवेवरुन दिसेल, असा टोलाही शिवेंद्रराजेंनी लगावला.
साठी बुद्धी नाठी : महाराजांची वाटचाल सध्या साठी बुद्धी नाठी, या म्हणीच्या दिशेने सुरु आहे. ती वेळ येऊ नये म्हणून त्यांनी कार्यकर्त्यांना आवर घालावा. पेटिंगसाठी आठवडाभर रात्री-अपरात्री रस्त्यावर फिरण्यापेक्षा विकास कामांसाठी रस्त्यावर उतरावे. त्यासाठी परमेश्वराने बुद्धी द्यावी, अशी खोचक टीका शिवेंद्रराजेंनी केली.
काय आहे प्रकरण? : सातार्यातील राहुल पाटोळे हे खासदार उदयनराजे यांचे समर्थक आहेत. त्यांनी खासदार उदयनराजेंच्या वाढदिवसानिमित्त तालीम संघाजवळील एका इमारतीच्या भिंतीवर मोठे चित्र रेखाटले आहे. त्याच धर्तीवर पोवई नाक्यावरील खासदार उदयनराजे यांच्या मालकीच्या इमारतीच्या भिंतीवर त्यांनी उदयनराजेंचे चित्र काढण्याची तयारी सुरू केली होती. चित्र काढण्यासाठी आणलेली क्रेन पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या घराच्या प्रवेशव्दारावर उभी करण्यात आली होती. त्याला पालकमंत्र्यांचे पुत्र यशराज देसाई यांनी हरकत घेतली होती. दरम्यान, पोलिसांनी चित्रकाराला वेळीच ताब्यात घेत तणावाचे वातावरण निवळले.