सातारा - साताऱ्यातील राष्ट्रवादी काँग्रेस भवनावर गुरुवारी सकाळी झालेल्या दगडफेकप्रकरणी दोषींना पोलिसांनी २४ तासात अटक करावी, अशी मागणी आमदार शशिकांत शिंदेंनी केली आहे. मराठे कधी पाठीमागून नाही, तर समाेरुन वार करतात' अशी संतप्त प्रतिक्रियाही त्यांनी व्यक्त केली.
पोलिसांनी हेतू शोधावा -
आमदार शशिकांत शिंदे यांनी या तोडफोडीच्या प्रकरणाचा निषेध केला. ते म्हणाले, मराठा समाजाच्या कालच्या आणि उद्याचा लढ्यात आम्ही सहभागी असू पण एकाच पक्षाला काेण टार्गेट करणार असेल तरी आम्ही देखील त्याच पद्धतीने उत्तर देऊ. हा प्रकार करणाऱ्याला पोलिसांनी २४ तासात अटक करावी. त्यांच्या हेतूचा शाेध लागला पाहिजे.
मराठा आरक्षणाबाबत केंद्राने पुढाकार घ्यावा. अख्खा महाराष्ट्र त्यांच्या पाठीशी उभा राहील. याबाबत खुद्द मुख्यमंत्र्यांनी हात जोडून विनंती केली आहे. नाही झाले तर धनगर आरक्षणात ज्या पध्दतीने वेळकाढूपणा करत राजकारण केले. त्यापध्दतीने मराठा आरक्षणाचे राजकारण करू नये. सगळ्यांनी मिळून या प्रश्नावर तातडीने निर्णय घ्यावा. मराठा समाजाची पोटतिडीक असेल तर भाजपने पुढाकार घ्यावा. आमची तयारी आहे. पण ज्यावेळी मराठा समाज आंदोलनात उतरेल, त्यावेळी आमच्यासारखे कार्यकर्ते या समाज बांधवांसमवेत खांद्याला खांदा लावून लढाईत उतरतील, असा विश्वास त्यांनी दिला.
मराठा आरक्षणाचे राजकारण केलं जात असल्याची खंत व्यक्त करुन आमदार शिंदे यांनी महाराष्ट्रातील वातावरण दुषित करण्याचा व शांतता भंग करण्याचे काम कोणी करत असेल तर राज्य सरकारने याची गांभीर्याने दखल घ्यावी, अशी मागणी यावेळी केली.