सातारा - शिक्षण बंद करण्याची धमकी देत बापानेच पोटच्या मुलीचे लैंगिक शोषण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी शाहूपुरी परिसरातील पीडित मुलीनेच शाहूपुरी पोलीस ठाण्यात बापाच्या विरोधात तक्रार दाखल केली होती. त्यानंतर संशयितावर पोस्कोंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे. तसेच त्या मुलीचे लैंगिक शोषण करुन तिला मारहाण करणाऱ्या नराधम बापाला शाहूपुरी पोलिसांनी अटकही केली आहे.
अश्लील चाळे करुन करायचा शोषण
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी १६ वर्षांची असून ती आपल्या कुटुंबासमवेत राहते. रात्रीच्यावेळी घरातील सर्वजण झोपले की बाप तिच्याशी अश्लील चाळे करुन तिचे लैंगिक शोषण करायचा. याप्रकाराला तिने विरोध केल्यानंतर तो तिला मारहाण देखील करायचा. या प्रकाराची माहिती जर कोणाला दिली अथवा कोणाला काही सांगितले तर तुझे शिक्षण बंद करेण अशी धमकी तो तिला देत होता.
पीडितेने स्वत: मांडली कैफियत
याप्रकरणी पीडित अल्पवयीन मुलीनेच बुधवारी दुपारी बापाच्या विरोधात शाहूपुरी पोलीस ठाण्यात आपली कैफियत मांडली. यानंतर संशयितावर पोस्कोंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. त्या नराधम बापाला अटक करण्यात आली आहे. याप्रकरणातील पीडित मुलगी अल्पवयीन असल्यामुळे तिच्यावतीने बापाच्या विरोधात स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या सहायक पोलीस निरीक्षक माधुरी जाधव यांनी तक्रार दिली. अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक संदीप शितोळे करत आहेत.