सातारा - तालुक्यातील एका गावातून अल्पवयीन मुलीस फूस लावून पळवून नेऊन तिच्यावर अत्याचार करणाऱ्या संशयित युवकास बोरगाव पोलिसांनी कर्नाटक राज्यातून अटक केली. अमोघसिद्ध महादेव कुंभार ( वय २२, रा. अहेरसंग, ता. इंडी, जि. विजापूर-कर्नाटक) असे अटक करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. शनिवारी जिल्हा न्यायालयात हजर केले असता त्याला पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
बोरगाव पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, बोरगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गावातील अल्पवयीन मुलगी ही लहानपणापासून तिच्या आजोळी राहत होती. मुलीला घरी यायचे असल्याने तिला आजोळहून भावाने एसटी बसमध्ये बसवून दिले. मुलीला बसमध्ये बसवून दिल्याची माहिती त्याने फोनवर दिली. मात्र सायंकाळ झाली तरी मुलगी घरी न आल्याने नातेवाईकांनी परिसरात शोध घेतला. ती न सापडल्याने मंगळवारी रात्री कुटुंबियांनी बोरगाव पोलीस ठाण्यात अज्ञाताविरोधात अल्पवयीन मुलीस फूस लावून पळवून नेण्याचा गुन्हा दाखल केला होता.
कर्नाटकमधील इंडीत मुलीवर अत्याचार
पोलीस तपास सुरु असतानाच अल्पवयीन मुलगी अचानक घरी परतली. कुटुंबियांनी मुलीस बोरगाव पोलीस ठाण्यात हजर केले. यावेळी तिच्याकडे अधिक चौकशी केली असता मुलीस अमोघसिद्ध कुंभार याने इंडी (कर्नाटक) येथे बोलावून घेऊन तेथील एका लॉजवर अत्याचार केल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी संशयितावर अपहरण, बलात्कार, लैंगिक अपराधापासून बालकांचे संरक्षण अधिनियम २०१२ चे कलम ४, ६ प्रमाणे गुन्हा दाखल केला.
बोरगाव पोलिसांनी लावला छडा
बोरगाव पोलिसांनी कर्नाटक पोलीस व सायबर सेलच्या मदतीने कर्नाटकातील नाद गावच्या शिवारात लपलेल्या संशयित अमोघसिद्ध कुंभार याला ताब्यात घेत अटक केली. शनिवारी पहाटे त्याला बोरगाव येथे आणून जिल्हा न्यायालयासमोर हजर केले. न्यायालयाने त्याला पाच दिवसांचा पोलीस कोठडी सुनावली.
हेही वाचा - व्हॉटस्अप ग्रुपवर अश्लिल व्हिडिओ शेअर केल्याप्रकरणी राष्ट्रवादीच्या नगरसेवकावर गुन्हा दाखल
हेही वाचा - सातारा : अंडी उधार दिली नाहीत म्हणून दुकानदाराचा खून, आरोपी स्वतः झाले पोलिसांसमोर हजर