सातारा - शिवसेना भवनाविषयी भाष्य करणारे भाजप आमदार प्रसाद लाड यांचा समाचार घेताना राज्याचे गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी महाबळेश्वर येथे पत्रकार परिषदेत 'तुमचे धाडस होणार नाही शिवसेना भवनाकडे तिरक्या नजरेने बघण्याचे' अशी टीका केली. भाजप आमदार प्रसाद लाड यांनी त्यांच्या वक्तव्याविषयी माफी जरी मागितली असली तरी त्यांच्या वक्तव्याचा शंभूराज देसाई यांनी जोरदार समाचार घेतला. गृहराज्यमंत्री म्हणाले, लाड जर त्यांच्या वक्तव्यावर कायम राहीले असते तर त्याचा परिणाम त्यांनी महाराष्ट्रभर पाहीला असता.
गृहराज्यमंत्री महाबळेश्वर तालुक्याच्या अतिवृष्टी भागाचा दौरा केला. त्यानंतर हिरडा नाका येथे पत्रकार परीषद आयोजित करण्यात आली होती. त्यात त्यांनी प्रसाद लाड यांच्याबाबत प्रतिक्रीया व्यक्त केली. यावेळी त्यांनी महाबळेश्वर तालुक्यांतील नुकसानीबाबतीत प्रशासनाला सुचना दिल्या.
कोणत्याही परिस्थितीत दळणवळण सुरू करा. दुर्गम व डोंगराळ महाबळेश्वर तालुक्याच्या मदतीसाठी सरकार संवेदनशील आहे. संवेदनशील मुख्यमंत्री सातारा जिल्ह्यातील परिस्थितीबाबत प्रशासन व येथील लोकप्रतिनिधींच्या संपर्कात आहेत. महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातून मदत ही नक्कीच मिळेल. याबाबत ठोस कृतीआराखडा लवकरात लवकर प्रशासनाने सादर करावा, अशी माहिती शंभूराज देसाई यांनी पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख यशवंत घाडगे, माजी शिवसेना जिल्हाप्रमुख राजेश कुंभारदरे, शिवसेना नेते डी. एम. बावळेकर, युवासेनेचे सचिन वागदरे, शिवसेना शहर प्रमुख राजू गुजर, शिवसेना कार्यकर्ते जितेश कुंभारदरे, नाना साळुंखे आदी उपस्थित होते.
हेही वाचा - पाण्यामुळे दैना, अन् पाण्यामुळेच पोहोचली मदत! पुरात अडकलेल्या ग्रामस्थांपर्यंत बोटीतून पोहोचली मदत