कराड (सातारा) - आपले जवान अहोरात्र सीमेवर देशाचे रक्षण करतात. त्यामुळेच देशाच्या कानाकोपर्यातील लोक सुरक्षित आहेत. सैन्यातील जवानांचे बलिदान व्यर्थ जाणार नाही. आपले रक्षण करताना हुतात्मा झालेल्या वीर जवानांच्या परिवाराचे रक्षण करण्याची जबाबदारी आपली असते. लोकप्रतिनिधी आणि सरकारचे प्रतिनिधी म्हणून त्यांच्या परिवाराची जबाबदारी आता आमची आहे. मुख्यमंत्र्यांनी हुतात्मा जवानांच्या कुटुंबीयांप्रती संवेदना व्यक्त केल्या आहेत. सचिन जाधव यांच्या कुटुंबीयांच्या पाठिशी शासन ठामपणे उभे राहिल, असे गृह राज्यमंत्री शंभूराज देसाई म्हणाले.
लेह-लडाख सीमेवर घुसखोरी करणार्या चिनी सैनिकांशी झालेल्या चकमकीत जवान सचिन जाधव यांना वीर मरण आले होते. त्यांच्या पार्थिवावर आज (दि. 19 सप्टें.) त्यांच्या मुळगावी दुसाळे (ता. पाटण) येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.
हुतात्मा सचिन जाधव यांचे पार्थिव विशेष विमानाने शुक्रवारी (दि. 18 सप्टें.) रात्री दहा वाजता पुणे विमानतळावर पोहोचले. तेथून त्यांचे पार्थिव सकाळी तारळे (ता. पाटण) येथे आणण्यात आले. त्याठिकाणी सजवलेल्या वाहनात पार्थिव ठेऊन तारळेपासून दुसाळे गावापर्यंत त्यांच्या पार्थिवाची अंत्ययात्रा काढण्यात आली. यावेळी तारळे पंचक्रोशीतील अबालवृद्धांनी त्यांच्या पार्थिवावर पुष्षवृष्टी करून अंत्यदर्शन घेतले. शासनाच्यावतीने गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई आणि पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी पार्थिवावर पुष्पचक्र अर्पण केले. यावेळी पोलीस अधिक्षक तेजस्वी सातपुते, पाटणचे प्रांताधिकारी श्रीरंग तांबे, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी विजयकुमार पाटील, पाटणचे तहसीलदार समीर यादव यांनी सचिन जाधव यांना आदरांजली वाहिली.
जाधव कुटुंबाला देशसेवेचा वारसा
आपल्या मुलानेही सैन्य दलात भरती होऊन देशसेवा करावी, अशी सचिन जाधव यांची इच्छा होती. म्हणून सचिन जाधव यांनी मुलगा आयुष याला सातारा येथील सैनिक स्कूलमध्ये दाखल केले होेते. आयुष सध्या सैनिक स्कूलमध्ये शिकत आहे. वडील संभाजी जाधव मेजर सुभेदार पदावरून सेवानिवृत्त झाले आहेत. एक भाऊ सैन्य दलातच आहे. आता देशसेवेचा वारसा असणार्या कुटुंबातील सचिन यांना वीरमरण आल्याने या कुटुंबाच्या त्यागाची आणि मुलाच्या बलिदानाचीच दुसाळे परिसरात आज चर्चा होती.
हेही वाचा - 'या' ऑडिओ क्लिपमुळे कोरोनातील गोरखधंदा उघड