सातारा - दुष्काळी परिस्थितीत सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे आहे. चारा व पाणी देण्यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करणार आहोत. श्रमदानाच्या चळवळीला लागेल ती मदत मी देणार असल्याचे पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर यांनी माणदेशीच्या जनतेला सांगतिले. तसेच दुष्काळाच्या परिस्थितीत राज्याची तिजोरी खाली करायला देखील तयार असल्याचे जानकर यांनी सांगितले.
दुष्काळ पाहणी दौऱ्यानिमित्त जानकर यांनी म्हसवड येथील माणदेशी फाउंडेशन संचलीत चारा छावणी व माळवाडी येथील चारा छावणीला भेट देऊन पाहणी केली. तसेच शेतकरी पशुपालकांशी संवाद साधला. त्यासोबत मार्डी व गोंदवले खुर्द येथील श्रमदानात सहभाग घेतला.
यावेळी मंत्री जानकर म्हणाले, की दुष्काळात होरपळणाऱ्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी चारा छावण्या सुरू केल्या आहेत. मागणीनुसार निकषात बदल करण्यात येत आहेत. प्रत्येक मोठ्या जनावरास दिवसाला पंधरा किलोवरून १८ किलो चारा देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. छावणी चालकांना ९० रुपये ऐवजी १०६ रुपये देण्यात येणार आहेत. मागणी केल्यास अजून चारापाणी वाढवण्यात येईल तसेच पेंड दर दिवशी दिली जाईल, अशी माहिती मंत्री महादेव जानकर यांनी दिली आहे.