सातारा - श्रीमंत छत्रपती शिवाजीराजे भोसले ( Chhatrapati Shivaji Raje Bhosale ) यांच्या पार्थिवावर बुधवारी राजघराण्याच्या प्रथेनुसार संगम माहुलीतील राजघाट स्मशानभूमीत अंत्यसंस्कार ( Cremation at Rajghat Crematorium in Mahuli ) करण्यात आले. नातू कौस्तुभराजे यांनी त्यांच्या पार्थिवास मुखाग्नी दिला. यावेळी खा. उदयनराजे भोसले, ( Udayanraje Bhosale ) आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले, कोल्हापूरचे श्री. छ. संभाजीराजे, खा. श्रीनिवास पाटील, आ. बाळासाहेब पाटील, आ. शशिकांत शिंदे यांच्यासह राजकीय मान्यवर उपस्थित होते.
अंत्यदर्शनासाठी अदालत वाड्यात गर्दी - पुण्यातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू असताना निधन झालेल्या श्री. छ. शिवाजीराजे भोसले यांचे पार्थिव साताऱ्यात आणण्यात आल्यानंतर अंत्यदर्शनासाठी सातारकरांनी गर्दी केली होती. यावेळी राजघराण्यातील मान्यवर उपस्थित होते. सातारकरांनी बुधवारी सर्व व्यवहार बंद ठेऊन त्यांना आदरांजली वाहिली.
राजघराण्याच्या प्रथेनुसार अंत्यसंस्कार- राजघराण्याच्या प्रथेनुसार श्री. छ. शिवाजीराजेंच्या पार्थिवावर बुधवारी दुपारी संगम माहुलीतील राजघाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले. तत्पूर्वी सजवलेल्या वाहनातून त्यांच्या पार्थिवाची अंत्ययात्रा काढण्यात आली. यावेळी सातारकर नागरीक मोठ्या संख्येने अंत्ययात्रेत सहभागी झाले होते.
चंद्रलेखाराजेंच्या निधनानंतर त्याच तारखेला पतीचे निधन - दोन वर्षांपूर्वी म्हणजे १३ सप्टेंबर २०२० रोजी श्रीमंत छत्रपती चंद्रलेखराजे यांचे निधन झाले आणि त्याच तारखेला, त्याच महिन्यात पती श्रीमंत छत्रपती शिवाजीराजे भोसले यांचेही निधन झाले. पत्नी आणि पतीचे एकाच तारखेला निधन झाल्याने सातारकरांनी या घटनेला सोशल मीडियावर उजाळा देत राजघराण्याप्रती संवेदना व्यक्त केल्या.
ट्विट करत पंतप्रधान मोदींनी वाहिली श्रद्धांजली - श्रीमंत छत्रपती शिवाजीराजे भोसले यांच्या निधनाने वृत्त दु:खदायक आहे. ते सदैव कार्यरत आणि अष्टपैलू व्यक्तिमत्व होते. लोकसेवेबरोबरच साताऱ्याच्या विकासात त्यांचे मोठे योगदान होते. त्यांचे कुटुंबीय आणि चाहत्यांप्रति मी माझ्या संवेदना व्यक्त करतो. ओम शांती, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी श्री. छ. शिवाजीराजे भोसले यांना श्रद्धांजली वाहिली आहे.