सातारा - महामार्ग आणि घाटरस्त्यांवर होणाऱ्या अपघातांपैकी धुक्यामुळे होणाऱ्या अपघातांची संख्य लक्षणिय आहे. धुक्यात गाडीचालवताना चालक आणि पादचाऱ्यांनी थोडी काळजी घेतली तर मोठे नुकसान व संभाव्य दुर्घटना टाळता येऊ शकतात, असे वाहतूक क्षेत्रातील जाणकारांचे म्हणने आहे.
अपघातााना धुके हे एक कारण -
गाडी चालवताना तिव्र वळणाचे किंवा चड-उताराचे रस्ते, अरुंद पूल, ब्लाईंड कॉर्नर, खड्डे या सारख्या समस्यांचा सामना करावा लागतो. हिवाळ्यात आणखी एक समस्या असते ती म्हणजे धुक्याची. धुक्यामुळे अनेकदा कार चालवताना पुढील वाहन दिसत नाही. पाटण, पाचगणी-महाबळेश्वर सारख्या तालुक्यांत हिवाळ्यात धुक्याचे प्रमाण अधिक असते. महामार्गावर पहाटेच्या वेळी धुक्यामुळे अनेकदा अपघात होण्याची शक्यता असते. धुक्यामुळे अपघात घडत असले तरी पोलिसांच्या पंचनाम्यात चालकाचा हलगर्जीपणा हे कारण येते. त्यामुळे धुक्यामुळे झालेल्या अपघातांची नेमकी संख्या सांगणे कठीन असले तरी धुके हे अपघाताच्या कारणांपैकी एक प्रमुख कारण मानले जाते.
काय काळजी घ्याल -
धुक्यात गाडी चालवताना काय काळजी घेतली पाहिजे, त्याविषयी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना सातारा जिल्हा वाहतूक शाखेचे पोलिस निरीक्षक संदीप भागवत यांनी सांगितले, सर्वांत पहिली गोष्ट लक्षात ठेवा की धुक्यात आपल्याला गाडी हळू चालवायची आहे. जर तुम्ही ताशी 45-50 किलो मीटर वेगाने गाडी चालवत असाल तर तुम्ही तुमचा वेग कमी करून ताशी 25-30 किलो मीटर करावा. यामुळे तुम्हांला पुढील गोष्टीचा अंदाज घेण्यास अधिक वेळ मिळेल व तुमचे ब्रेकिंग डिस्टंस देखील कमी होईल."
लेन बदलने टाळा -
ते म्हणाले, "धुक्यामध्ये गाडी चालवताना शक्यतो लेन बदलणे टाळा. रस्त्यावरील मार्किंगमुळे तुम्हांला रस्त्याच्या रुंदीबद्दल देखील समजते आणि यामुळे योग्य रस्त्यावर गाडी चालवण्यास मदत होते. धुक्यात गाडी चालवताना हाय बिमपेक्षा लो बिम नेहमी सुरू ठेवा. लो बिममुळे व्हिजिबिलिटी वाढते. याशिवाय फॉग लाईट्सचा देखील वापर करावा"
गाडी चालवताना हॅझर्ड लँम्पचा वापर करू नका -
महामार्ग वाहतूक नियंत्रण शाखेचे भुईंज येथील सहाय्यक निरीक्षक दत्तात्रय गुरव म्हणाले, "बऱ्याच वेळा धुक्यात किंवा बोगद्यातून गाडी चालवताना सगळ्यात बेसिक चुक चालक करतात ती म्हणजे पार्किंग लाईट (हॅझर्ड लँम्प) सुरू ठेवतात. कार बंद पडली अथवा रस्त्याच्या कडेला उभी केली असल्यासच या लँम्पचा वापर करायचा असतो. गाडी चालवत असताना हॅझर्ड लँम्पचा उपयोग केल्याने इतर चालकांचा गोंधळ होऊ शकतो. त्यातूनही अपघातांना निमंत्रण मिळते.
थांबा आणि वाट बघा –
जर खूपच धुके असेल आणि गाडी चालवताना समोरील काहीच दिसत नसेल, तर अशा वेळेस गाडी सुरक्षित ठिकाणी बाजूला थांबून वाट पहा. जोपर्यंत वातावरण व्यवस्थित होत नाही व समोरील गोष्ट योग्यरित्या दिसू शकतील तोपर्यंत वाट पहा. कारण एकवेळेस उशीर झाला तरी चालेल पण सुरक्षितरित्या पोहचणे अधिक महत्त्वाचे असते, असे सातारा तालुका आरएसपी निवृत्त समादेशक मधुकर शेंबडे यांनी सांगितले.
अशी घ्याल काळजी -
अनुक्रमांक | धुक्यात गाडी चालवताना हे लक्षात ठेवा |
1 | धुक्यात गाडी चालवताना मोबाईलवर बोलणे टाळा. |
2 | गाडीत मोठ्या आवाजात गाणी सुरू ठेऊ नका. |
3 | खिडकीच्या काचा उघड्या ठेवा, कारण समोरून किंवा मागच्या बाजूने आलेल्या वाहनाचा आवाज तुम्हाला ऐकू येईल. |
4 | धुक्यातून गाडी सावकाश आणि कमी वेगाने न्या. |
5 | रस्त्यावर किंवा घाटात रांग असल्यास शिस्त पाळा आणि रांग मोडू नका. दुसऱ्या वाहनापासून सुरक्षित अंतर ठेवा. |
6 | ओव्हरटेकचा प्रयत्न धुक्यात धोक्याचा ठरू शकतो. |
7 | धुक्यात गाडी चालवताना फॉग लाईटचा वापर करा. ही सुविधा नसल्यास हेडलाईट लो बिमवर ठेवावा. |