सातारा : लडाखमधील लेह जिल्ह्यात लष्कराचे वाहन खोल दरीत कोसळून झालेल्या दुर्घटनेत सातारा जिल्ह्यातील हिंगणगावचे (ता. फलटण) सुपूत्र वैभव भोईटे शहीद झाले होते. आज वैभव भोईटे यांच्या पार्थिवावर राजाळे येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.
साश्रू नयनांनी अखेरचा निरोप : हुतात्मा वैभव भोईटे यांचे पार्थीव लेहवरुन दिल्ली, हैद्राबाद मार्गे पुणे येथे विमानाने आणण्यात आले. पुणे येथून विशेष वाहनातून राजाळे येथे आणण्यात आले. शासकीय इतमामात शहीद जवानाला मानवंदना देण्यात आली. यावेळी कुटूंबीयांचा आक्रोश पाहुन अनेकांना आपले अश्रू अनावर झाले. आजोबांनी कडेवर घेतलेल्या दीड वर्षाची नात हिंदवीने पार्थिवाला मुखाग्नी दिला.
मान्यवरांनी घेतले अंत्यदर्शन : सोमवारी राजाळे गावची बाजारपेठ बंद ठेवण्यात आली. गावचा सुपूत्र शहीद झाल्याने गावात नागपंचमीचा सणही साजरा झाला नाही. अंत्यसंस्कारावेळी परिसरातील लोक मोठ्या संख्येने शहीद जवानाला अखेरचा निरोप देण्यासाठी उपस्थित होते. खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांनी अंत्यदर्शन घेतले. पार्थिवावर पुष्पचक्र अर्पण करून आदरांजली वाहिली.
शासकीय इतमामात अंत्यसंस्कार : शहीद जवान वैभव भोईटे यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. लष्करी जवानांनी हवेत बंदुकीच्या तीन फैरी झाडून आणि अंतिम बिगुल वाजवून शहीद जवानाला अखेरची मानवंदना दिली.
लडाखमध्ये होती पोस्टिंग : लडाखच्या लेह जिल्ह्यात शनिवारी चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने सैनिकांना घेऊन निघालेले लष्करी वाहन दरीत कोसळले होते. लष्कराच्या वाहनात 10 सैनिक होते. या अपघातात नऊ जवानांचा मृत्यू झाला तर एक जवान जखमी झाला होता. दक्षिण लडाखमधील न्योमा येथील कियारीजवळच्या दुर्घटनेत शहीद झालेल्या जवानांमध्ये सातारा जिल्ह्यातील हिंगणगाव (ता. फलटण) गावचा सुपूत्र वैभव भोईटे यांचा समावेश होता. त्यांच्या युनिटची पोस्टिंग लडाखमध्ये होती.
हेही वाचा -
Ladakh Accident : सातार्याचा जवान लडाखमधील दुर्घटनेत शहीद, फलटण तालुक्यावर शोककळा