सातारा Maratha Reservation : उपोषणकर्ते मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ सातारा जिल्हा बंदची हाक देण्यात आली आहे. मात्र, बंदला माण तालुक्यात हिंसक वळण लागलं आहे. नाशिक-गोंदवले एसटी बसच्या काचा फोडण्यात आल्या आहेत, तर दहिवडीतील विद्यार्थ्यांनी आरक्षण मिळेपर्यंत परीक्षेवर बहिष्कार घातला आहे. कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, म्हणून जिल्ह्यात 10 नोव्हेंबरपर्यंत जमावबंदी लागू करण्यात आली आहे.
एसटीच्या काचा फोडल्या : माण तालुक्यात बंदला हिंसक वळण लागलंय. गोंदवले येथे नाशिक-गोंदवले एसटीवर अज्ञातांनी दगडफेक केल्यानं एसटीच्या काचा फुटल्या आहेत. या घटनेनंतर एसटी बस दहिवडी बसस्थानकात लावण्यात आली आहे. दगडफेकीमुळं गोंदवले नगरीतील पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे.
विद्यार्थ्यांचा परीक्षेवर बहिष्कार : माण तालुक्यातील दहिवडी येथील महात्मा गांधी विद्यालयातील विद्यार्थ्यांनी आरक्षण मिळेपर्यंत शाळेत न जाण्याचा निर्णय घेतला आहे. तसंच जोपर्यंत आरक्षण मिळत नाही, तोपर्यंत परीक्षेचा पेपर देणार नसल्याची भूमिका विद्यार्थ्यांनी घेतली आहे. शाळा शिकून नोकरी लागणार नसेल, तर शाळेत जाऊन काय उपयोग, असा सवाल शाळकरी मुलांनी केला आहे.
जिल्ह्यात जमावबंदी लागू : कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवू नये, म्हणून जिल्हाधिकाऱ्यांनी जमाव बंदी आदेश लागू केला आहे. यात्रा, धार्मिक कार्य, लग्न कार्य, अंत्यविधी तसंच शांततेच्या मार्गानं एकत्र जमून कोणताही कार्यक्रम साजरा करावयाचा असेल त्यावेळी पोलीस अधीक्षक, उपविभागीय पोलीस अधिकारी, पोलीस निरिक्षकांची आगाऊ परवानगी घ्यावी लागणार आहे.
कराड शहरात भगवं वादळ : मराठा आरक्षणाचा लढा राज्यभर तीव्र झाला आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आज सातवा दिवस असून त्यांना राज्यभरातून उत्स्फूर्त पाठिंबा मिळत आहे. साताऱ्यातील कराड शहरात सोमवारी हजारो मराठा बांधवांनी आरक्षणाच्या मागणीसाठी जरांगे-पाटील यांना पाठिंबा देत भव्य मोर्चा काढला. एक मराठा, लाख मराठा, आरक्षण आमच्या हक्काचे, नाही कुणाच्या बापाचे अशा घोषणा देत कराड शहरातून मोर्चा काढण्यात आला. मोर्चात मराठा तरुणांनी 'मराठ्यांचा अंत पाहू नका, आधी आरक्षण, मग निवडणूक, मनोज जरांगे तुम्ही लढा, आम्ही तुमच्या सोबत आहोत' असे लक्षवेधी पोस्टर्स लावले होते. कराड बार असोसिएशननं मोर्चात सहभागी होऊन मराठा आरक्षणाला पाठिंबा जाहीर केला.
हेही वाचा -