सातारा Manoj Jarange Patil Sabha in Karad : कराडच्या छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियमवर (Chhatrapati Shivaji Maharaj Stadium Karad) आज सायंकाळी मराठा आरक्षण योद्धा मनोज जरांगे-पाटील यांची सभा होणार आहे. या सभेसाठी सशस्त्र पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. यापुर्वी बाळासाहेब ठाकरे, श्रीमती सोनिया गांधी आणि शरद पवार या दिग्गजांच्या सभा शिवाजी स्टेडियमवर झालेल्या आहेत. त्यांच्या सभांच्या गर्दीचा रेकॉर्ड जरांगे-पाटील मोडणार का? याचीच सर्वत्र उत्सुकता आहे.
रात्री १ वाजता झाली होती पवारांची सभा : कराडच्या शिवाजी स्टेडियमवर १९८५ मध्ये रात्री एक वाजता शरद पवार यांची सभा झाली होती. रात्रीचे एक वाजले असतानाही ७० ते ८० हजार लोक सभेला उपस्थित होते. शरद पवार हे त्यावेळी समाजवादी काँग्रेसमध्ये होते. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर झालेल्या शरद पवारांच्या सभेला लोकांचा मोठा प्रतिसाद मिळाला होता, अशी आठवण सभेला उपस्थित असणारे ज्येष्ठ विधीज्ञ बाळासाहेब देसाई यांनी सांगितली.
बाळासाहेबांची ठाकरी शैलीत सभा : १९९६ च्या लोकसभा निवडणुकीच्या काळातील बाळासाहेबांच्या सभेची आठवण सांगताना ॲड. देसाई म्हणाले की, कराड लोकसभा मतदारसंघातून सहकार महर्षी जयवंतराव भोसले हे शिवसेनेचे उमेदवार होते. त्यांच्या प्रचारासाठी खुद्द शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी स्टेडियमवर सभा घेतली होती. ती सभा देखील उच्चांकी गर्दीत झाली होती. खास ठाकरी शैलीत बाळासाहेबांनी भाषण केले होते. बाळासाहेबांना पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी लोक मोठ्या संख्येने सभेला उपस्थित होते.
सोनियांच्या सभेला लाखावर माणसं : काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधींनी २००३ साली विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पश्चिम महाराष्ट्राचा झंझावाती दौरा केला होता. साताऱ्यातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी मंत्री दिवंगत विलासराव पाटील-उंडाळकर यांनी सोनिया गांधींच्या सभेचं आयोजन केलं होतं. १९ ऑक्टोबर २००३ रोजी भर दुपारी कडाक्याच्या उन्हात सभा असतानाही लाखावर लोक सोनिया गांधींच्या सभेला उपस्थित होते. अलिकडच्या काळातील ती सर्वात मोठी सभा ठरली होती, असे ॲड. बाळासाहेब देसाई म्हणाले.
जरांगे-पाटलांची सभा उच्चांकी होईल : सध्या मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर मनोज जरांगे-पाटील यांच्या सभांना होत असलेली गर्दी पाहता शिवाजी स्टेडियमवरील शुक्रवारची सभा देखील उच्चांकी होईल, असा अंदाज ॲड. देसाई यांनी वर्तवला आहे. बाळासाहेब ठाकरे, सोनिया गांधी आणि शरद पवार यांच्या सभांना झालेल्या गर्दीची मनोज जरांगे-पाटील यांच्या सभेतील गर्दीशी नक्कीच तुलना होणार आहे. त्यामुळे स्टेडियमवर होणाऱ्या गर्दीकडे सर्वांचे लक्ष लागून राहील, असेही ॲड. देसाई म्हणाले.
पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त : मनोज जरांगे-पाटील यांच्या सभेसाठी कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. १ पोलीस उपअधीक्षक, २ पोलीस निरीक्षक, २३ सहाय्यक पोलीस निरीक्षक/उपनिरीक्षक, १८० पोलिस कर्मचारी, २५ होमगार्ड, २० खासगी सुरक्षा रक्षक, १ दंगा काबू पथक, बीडीएस पथक, श्वान पथक, २५ लाठ्या, ५० ढाली, २५ हेल्मेट, १ गॅसगन, ६४ एसएलआर, १० इंसास, ५ कार्बाइन, १० बंदुका, २ पिस्टल आणि १ एके ४७ रायफल, इत्यादी साधन सामुग्रीचा बंदोबस्तात समावेश आहे.
हेही वाचा -