सातारा - माण-खटावचे युवा नेते शेखर गोरे यांनी गुरुवारी मुंबईत शेकडो कार्यकर्त्यांसोबत मातोश्रीवर शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांची भेट घेऊन शिवसेनेत प्रवेश केला. गोरे शिवसेनेत गेल्याने माण- खटावच्या राजकारणात भूकंप झाला असून याठिकाणची राजकीय समीकरणे बदलणार आहेत.
राष्ट्रवादी पक्षात सन्मानाची वागणूक मिळत नाही. त्यामुळे फलटण येथील शरद पवारांच्या सभेत गोरे यांच्या समर्थकांनी गोंधळ घालून आपली व्यथा मांडली होती. त्यानंतर त्यांनी राष्ट्रवादीला रामराम करत यापुढे माण विधानसभा निवडणूक अपक्ष लढण्याची भूमिका घेतली होती. त्यानंतर माण मतदारसंघात आमदार जयकुमार गोरे यांच्या विरोधात सर्वपक्षीय नेत्यांनी आघाडी उघडली. पण या आघाडीतील नेत्यांनी दोन्ही गोरे बंधूंना विरोध केला आहे. तसेच शेखर गोरे आघाडीत येणार असतील तर त्यांनी निवडणुकीसाठी उमेदवारी मिळावी म्हणून येऊ नये, असे स्पष्ट केले. परिणामी शेखर गोरेंची अडचण झाल्यामुळे त्यांनी शेवटी शिवसेनेत जाण्याचा निर्णय घेतला.
माण तालुक्यातील राजकारणाची समीकरणे बदलणार
शेखर गोरे हे आमदार जयकुमार गोरे याचे छोटे बंधू आहेत. तालुक्यातील राजकारण व राष्ट्रवादीला पडत्या काळात स्वतःच्या बंधू विरोधात जाऊन पंचायत समिती, बाजार समिती, खरेदी विक्री संघ आणि जिल्हा परिषद सदस्य निवडून आणले आहेत. त्यांनी म्हसवड नगरपालिका सुध्दा काबीज केली. ते सातारा-सांगली विधानपरिषद निवडणूक २०१६ साठी राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार होते. या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला त्यानंतर ते राष्ट्रवादीपासून दुरावले. २०१४ मध्ये त्यांनी राष्ट्रीय समाज पक्षाकडून माण विधानसभेची निवडणूक लढवली होती. त्यावेळी त्यांनी ५२ हजार मते मिळवली होती.