सातारा - इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठाने (इग्नू) यंदाच्या वर्षापासून सुरू केलेल्या ज्योतिष विषयी अभ्यासक्रावर अंधश्रद्धा निर्मूलन समितीने जोरदार आक्षेप घेतला आहे. हा अभ्यासक्रम तातडीने मागे घ्यावा, अशी मागणी अंनिसने केली आहे.
ज्योतिष हे छद्म-विज्ञान
समितीने म्हंटले आहे की, "ज्योतिष या विषयाला कोणताही शास्त्रीय आधार नाही. ते एक छद्म विज्ञान आहे. ग्रह-गोल-ताऱ्यांचा शास्त्रीय अभ्यास करणाऱ्या विज्ञान शाखेला ‘खगोलशास्त्र’ म्हणतात. या शास्त्राच्या उपलब्ध अभ्यासानुसार ग्रह-गोल-ताऱ्यांचा मानवी जीवनावर कोणताही प्रभाव पडत नाही. त्यामुळे अशा संपूर्ण अशास्त्रीय गोष्टींचे प्रशिक्षण देण्याचा दावा करणारा ज्योतीष अभ्यासक्रम तातडीने रद्द करणे आवश्यक आहे."
फोलपणा सिद्ध आहे
अटलबिहारी वाजपेयी सरकारने २००१ साली अशा स्वरूपाचा निर्णय घेतला होता. तो मोठ्या प्रमाणात विरोध झाल्यावर मागे घेण्यात आला. डॉ.जयंत नारळीकर यांच्यापासून अनेक ज्येष्ठ खगोल वैज्ञानिकांनी याला विरोध केला होता. ज्येष्ठ वैज्ञानिक जेम्स रॅन्डी यांनी ज्योतिषांनी जगाच्या अंताच्या विषयी केलेल्या ५० दाव्यांचा अभ्यास करून त्यांचा फोलपणा सिद्ध केला होता. तसेच भारतीय वंशाचे नोबेल पारितोषिक विजेते व्ही.वेन्कटरामन यांनी देखील ज्योतिषाची तुलना छद्मविज्ञानाशी केली आहे.
दिशाभूल करणारा प्रकार
इग्नूच्या या अभ्यासक्रमात चंद्रग्रहण, सूर्यग्रहण अशा खगोल शास्त्रीय घटनाच्या विषयी अज्ञान आणि भीती पसरवण्याचे काम केले जात आहे. ग्रहणाच्या कालखंडात नीट आहार न घेतल्याने गरोदर महिलेचा मृत्यू झाल्याची घटना दोन वर्षांच्या पूर्वी घडली होती. त्याुळे अशा गैरसमजांना बळकटी देणाऱ्या अवैज्ञानिक गोष्टी लोकांच्या जीवाशी खेळ आहेत. एकाच वेळी ज्योतिषाला विज्ञान म्हणायचे आणि त्यावर आधारित उपाय सुचवायचे आणि शिकवताना मात्र ते कला माध्यमात अभ्यासक्रम म्हणून घालायचे हा देखील दिशाभूल करणारा प्रकार आहे. समाजातील ज्योतिष विषयक गैरसमज दूर करणे हा शिक्षणाचा मुख्य उद्देश आहे. ज्या विद्यापीठाच्या माध्यमातून ज्ञान दिले जाते, त्या मुक्तविज्ञापीठाने असा अभ्यासक्रम सुरु करणे हे अत्यंत आक्षेपार्ह आहे, असेही समितीने म्हटले आहे.
महाराष्ट्र शासनाने निर्णय घ्यावा
महाराष्ट्र शासनाने अशा स्वरूपाच्या अवैज्ञानिक गोष्टींची अंमलबजावणी बाबत स्थगिती द्यावी अशी देखील मागणी महाराष्ट्र अंनिसचे जेष्ठ कार्यकर्ते आणि छद्मविज्ञान अभ्यासक प्रा. प. रा. आर्डे, अंनिस बुवाबाजी संघर्ष राज्य विभागाचे प्रशांत पोतदार, नंदिनी जाधव, केदारनाथ सुरवसे, चंद्रकांत उळेकर, कमलाकर जमदाडे, भगवान रणदिवे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केली आहे. विद्यापीठाने हा अभ्यासक्रम तातडीने स्थगित करावा यासाठी देशभरातील प्रमुख पंचवीस वैज्ञानिक आणि शिक्षणतज्ञांच्या सह्यांचे निवेदन मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांना देण्यात येणार असल्याचे देखील या प्रसिद्धीपत्रकात नमूद केले आहे.