सातारा : महाबळेश्वर येथील पारा मागील काही दिवसांपासून घसरत आहे. अचानक तापमानात घट झाली असून पहाटे थंडीचा कडाका वाढला आहे. अवकाळी पावसानंतर जिल्ह्यातील तापमानात मोठा बदल दिसून येत आहे. महाराष्ट्राचे मिनी काश्मीर म्हणून ओळखल्या जाणार्या महाबळेश्वरमध्ये ऐन उन्हाळ्यात गेली दोन दिवस दवबिंदू गोठल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. त्यामुळे पर्यटक सुखावले असून चक्क उन्हाळ्यात महाबळेश्वरला काश्मीरचा फील आला आहे.
पहाटे थंडीचा कडाका: मागील काही दिवसांत अवकाळी पावसाने झोपडल्यानंतर आता सातारा जिल्ह्यातील तापमानात घट झाली आहे. दिवसभर कडक उन्हाळा जाणवत असला तरी पहाटे कडाक्याची थंडी आणि धुके देखील पाहायला मिळत आहे. महाराष्ट्राचे मिनी काश्मीर म्हणून ओळखल्या जाणार्या महाबळेश्वरातील किमान तापमानात मोठी घट होऊन दवबिंदू गोठल्याचे पाहायला मिळाले. ऐन उन्हाळ्यातील हा नजारा पर्यटकांना आंनद देत आहे.
दवबिंदूचे रूपांतर हिमकणात : महाबळेश्वरमध्ये पहाटेच्या सुमारास दवबिंदू गोठून त्याचे हिमकणात रूपांतर होत आहे. वेण्णालेक परिसरात दवबिंदू गोठल्याचे पाहायला मिळाले. वेण्णालेक जेट्टीसह वाहनांच्या टपांवर हिमकण जमा झाल्याचे दिसून आले. महाबळेश्वरसह वाई, पाचगणी, भोसे या भागातील तापमानात घट झाल्यामुळे पर्यटक ऐन उन्हाळ्यात काश्मीरसारख्या थंड वातावरणाचा अनुभव घेत आहेत. तर महाबळेश्वरच्या थंड वातावरणात विकेंड साजरा करण्यासाठी पर्यटकांची पावले महाबळेश्वर, पाचगणीकडे वळत आहे. विकेंड बरोबरच सुट्ट्यांच्या निमित्ताने देखील पर्यटकांची वर्दळ आता वाढणार आहे. पर्यटकांची गर्दी वाढायला सुरूवात झाल्याने महाबळेश्वरची बाजारपेठ पर्यटकांसाठी सज्ज झाली आहे.
जानेवारीत प्रथमच : यंदा जानेवारी महिन्यात पारा कमालीचा घसरला होता. १० जानेवारी रोजी पहिल्यांदा महाबळेश्वरमध्ये दवबिंदू गोठल्याचे पाहायला मिळाले होते. तसेच वेण्णालेक परिसरात पाच अंश तर संपूर्ण महाबळेश्वरात सरासरी तापमान सात अंश इतके दिसून आले. नंदनवनात थंडीचा कहर होता. तर या कडाक्याच्या थंडीमुळे पर्यटक मुख्य बाजारामध्ये फिरताना शालचा, स्वेटरचा, कानटोपीचा वापर करत आहेत.