सातारा - राष्ट्रवादीतून निवडून आल्यानंतर खासदारकीचा राजीनामा देत, भाजपवाशी झालेले राज्यसभा खासदार उदयनराजे भोसले यांच्या, महाविकास आघाडीतील नेत्यांसोबत भेटीगाठी वाढल्या आहेत. यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना ऊत आला आहे.
मागील आठवड्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार व महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी साताऱ्याचा दौरा केला. या दौऱ्यानंतर शिवसेना नेते आणि गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी उदयनराजे यांची भेट घेतली. देसाई यांच्यानंतर काँग्रेस नेते आणि राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवर, उदयनराजेंच्या भेटीसाठी जलमंदिर पॅलेसला पोहोचले. यामुळे चर्चेला ऊत आले आहे.
दरम्यान, विजय वडेट्टीवार यांनी आढावा बैठकीच्या निमित्ताने सातारा दौरा केला. त्यावेळी त्यांनी उदयनराजे भोसले यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली होती. तर त्याआधी शिवसेना नेते आणि गृहराज्यमंत्री शंभुराज देसाई यांनीही उदयनराजेंची भेट घेतली होती. यावेळी त्यांनी भेटीत कोणतीही राजकीय चर्चा केली नाही. ही केवळ सदिच्छा भेट होती. उदयनराजे आणि मी वर्गमित्र आहे, असे सांगितले होते.
उदयनराजे यांनी लोकसभा निवडणूक राष्ट्रवादी कांँग्रेसकडून लढवली. यानंतर त्यांनी खासदारकीचा राजीनामा देत भाजपवाशी झाले. त्यांनी पुन्हा निवडणूक लढवली. तेव्हा राष्ट्रवादीचे उमेदवार श्रीनिवास पाटील यांनी उदयनराजे यांचा 87 हजार 717 मतांनी पराभव केला. त्यानंतर उदयनराजेंना राज्यसभेवर खासदारकी मिळाली.
हेही वाचा - पाचगणी रुग्णालयातून पळालेली कोरोनाबाधित तरुणी मुंबईत सापडली
हेही वाचा - यावर्षी बेंदूर सणावर कोरोनाचे सावट, कोरोनामुळे बळीराजा आर्थिक संकटात