कराड (सातारा) - ज्या शरद पवारांविरोधात आंदोलन केले. त्यांच्याच घरी राजू शेट्टी जेवायला जातात, याला काय अर्थ आहे? मग पवार सुतासारखे सरळ झाले, की शेट्टी त्यांना शरण गेले, असा खोचक सवाल भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला. कराड येथील कृष्णा हॉस्पिटलच्या कोरोना विभागाला भेट दिल्यानंतर पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधला.
भाजपाचे दूध दरवाढी संदर्भातील आंदोलन मतलबी असल्याची टीका राजू शेट्टी यांनी केली होती. त्या टीकेला चंद्रकांत पाटील यांनी खोचक सवाल करत प्रत्त्युत्तर दिले. ते म्हणाले, ज्या शरद पवारांविरोधात आंदोलन केले. त्यांच्याच घरी राजू शेट्टी जेवायला जातात. याला काय अर्थ आहे? त्यामुळे मतलबी कोण आहे, ते शेतकरी जाणतात. राजू शेट्टी काय म्हणतात, यापेक्षा आमचे आंदोलन शेतकऱ्यांना मतलबी वाटते का, ते हिताचे आहे की नाही, हे शेतकरीच ठरवतील, असेही पाटील यावेळी म्हणाले.