सातारा - कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर गेल्या 49 दिवसांपासून लॉकडाऊन झालेली दारूची दुकाने सुरू करण्यास जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी परवानगी दिली आहे. दारू विक्रीला परवानगी मिळाल्यामुळे जिल्ह्यातील तळीरामांना दिलासा मिळाला आहे.
देशात तिसऱ्या टप्प्यातील लॉकडाऊन सुरु झाल्यानंतर 4 मे पासून कंटेटमेंट झोन वगळता इतर भागात अटी-शर्तींसह दारु विक्रीला परवानगी देण्यात आली होती. मात्र, साताऱ्यात जिल्हाधिकाऱ्यांनी दारु विक्रीला परवानगी नाकारली होती. त्यानंतर आज जिल्हाधिकाऱ्यांनी दारु विक्रीला परवानगी दिली आहे.
जिल्ह्यात कोरोना संसर्ग हा बाहेरील जिल्ह्यातून व मुंबई-पुण्यातून आलेल्या लोकांमुळे वाढला आहे. त्यामुळे ग्रीन झोनमध्ये असलेला सातारा जिल्हा आता रेड झोनमध्ये गेला आहे. त्यामुळे रोजचचं मढं, त्याला कोण रडं? अशा पद्धतीने जिल्ह्यात दारूच्या दुकानाबाहेर 'फिजिकल डिस्टन्सिंग'चा बोजवारा उडेल, असे वाटले होते. मात्र, तळरामांनी रांगेत सर्व नियमांचे पालन करत दारु खरेदी केली.