सातारा - शहराजवळच्या वाढे गावात त्रिपुरी पौर्णिमेनिमित्त दिपोत्सव उत्साहात साजरा झाला. वाढे गावचे ग्रामदैवत असलेल्या भैरवनाथ वाढेश्वर मंदिराच्या घाटावर 1001 दिवे लावल्याने त्रिपुरी पौर्णिमेनिमित्त परिसर उजळून निघाला होता. यासाठी शिवसेनेचे ज्येष्ठ नेते हैबतराव नलावडे यांनी पुढाकार घेतला होता.
त्रिुपुरी पौर्णिमेनिमित्त दिव्यांनी रविवारी रात्री उशीरापर्यंत वेण्णा नदीचा परिसर लखलखून गेला होता. शिवसेना तालुका प्रमुख दत्ता नलावडे यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी दिपोत्सवाचे आयोजन केले होते. हा दिपोत्सव पाहण्यासाठी पंचक्रोशीतील नागरिकांनी गर्दी केली होती.
त्रिपूर वात लावून उत्सव साजरा-
कार्तिक पौर्णिमा म्हणजेच त्रिपुरारी पौर्णिमेला शिवमंदिरात त्रिपुर वात (उंच खांबावर असलेल्या दिव्याची वात) लावली जाते. एकादशीपासून सुरू झालेले तुळशी विवाह करण्याचा हा शेवटचा दिवस असतो. त्रिपुरी पौर्णिमेचे औचित्य साधून मंदिर आणि सार्वजनिक ठिकाणी दीपोत्सव साजरा करण्यात येतो. मंदिरांमध्ये असलेल्या दगडी दीपमाळा या संध्याकाळी वाती लावून उजळल्या जातात. भगवान शंकरापुढे त्रिपूर वात लावून भाविक उत्सव साजरा करतात.
हेही वाचा-दीपोत्सव : हजारो दिव्यांनी नृसिंहवाडीचा दत्त मंदिर परिसर निघाला उजळून
कृष्णा नदीत दीपदान
जिल्ह्यात नदीच्या घाटावरील मंदिर परिसरात मातीच्या दिव्यांची रोषणाई करण्याची प्रथा आजही प्रयत्नपुर्वक पाळली जाते. अनेक ठिकाणी लोकांनी रविवारी घरात व देवळातही दिव्यांची आरास करून पूजा केली. संगम माहुली येथे कृष्णा नदीत दीपदान करून भाविकांनी उत्सव साजरा केला.
हेही वाचा-पुणे : त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त श्री महालक्ष्मी मंदिरात 11 हजार पणत्यांचा 'दीपोत्सव'
पौराणिक आख्यायिका
त्रिपुरासुर नावाच्या राक्षसाने खडतर तप करून ब्रह्मदेवाकडून शत्रूंपासून भय राहणार नाही असा वर घेतला. नंतर त्याने उन्मतपणा केल्याने भगवान शंकरांनी त्याची तिन्ही नगरे जाळून त्याला ठार केले. कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी ही घटना घडल्यामुळे तिला त्रिपुरारी पौर्णिमा म्हटले जाते, अशी पौराणिक आख्यायिका आहे.